लोहारा (जि. धाराशिव) : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील श्री जयलक्ष्मी माऊली ज्वेलर्स या सराफ दुकानावर अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी पहाटे धाडसी धाड टाकत सुमारे ७ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात नव्याने आणलेली ५ किलो चांदी, मोडीसाठी आलेली ३ किलो चांदीची दागदागिने आणि ४० हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे उघड झाले आहे.
दुकानाचे मालक अविनाश फुलसुंदर यांचे भाऊ श्रीनिवास फुलसुंदर सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे ७ वाजता दुकान बंद करून गेले होते. पहाटे ३:३९ वाजता वॉचमन शिवलिंग साखरे यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर दुकानाचे सुरळीत फोटो शेअर केले. मात्र ४:१० वाजता त्याच वॉचमनने दुकान फोडल्याची माहिती दिली. फुलसुंदर बंधूंनी घटनास्थळी धाव घेतली असता दुकानाच्या चॅनल गेटवरील आठही कुलूप तोडलेले आणि शटर उचललेले आढळले. त्यांनी तत्काळ पोलिसांना संपर्क केला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे आणि त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी हजर होत तपास सुरू केला. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायर तोडून हार्डडिस्क काढण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. चोरट्यांनी दुकानातील सुमारे ८ किलो चांदी आणि ४० हजारांची रोकड चोरल्याचे निष्पन्न झाले.
सीसीटीव्हीमधील धक्कादायक चित्रफीतचोरी ३:४१ ते ४:१० दरम्यान घडल्याचे स्पष्ट झाले असून, तीन चोरटे मास्क व हातमोजे घालून दुकानात घुसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. चोरट्यांनी नवीन चांदी – ५ किलो (५.७० लाख), मोड चांदी – ३ किलो (१.७१ लाख), रोख रक्कम – ४०,००० असा एकूण ७ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
फिंगरप्रिंट आणि डॉग स्क्वॉडला अपयशचोरट्यांनी हातात ग्लोज घातल्यामुळे फिंगरप्रिंट तज्ज्ञांना ठसे मिळाले नाहीत. तर घटनास्थळी सुगंधित द्रव्य टाकल्याने डॉग स्क्वॉड देखील अपयशी ठरले.
तीन पोलिस पथकांचा शोधमोहीमेला प्रारंभलोहार पोलिसांनी चोरांचा शोध घेण्यासाठी तीन स्वतंत्र पथकांची स्थापना केली असून, त्यातील दोन पथके परराज्यात पाठवण्यात आली आहेत. या पथकांचे नेतृत्व एसआय कुकलारे, पो.ह. अर्जुन तिगाडे आणि पो.ह. निरंजन माळी करीत आहेत.
सराफ असोसिएशनचा निषेध, सुरक्षा मागणीधाराशिव जिल्हा सराफ सुवर्णकार फेडरेशनने पोलिसांना निवेदन देत ही घटना धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. याआधीही लोहारा व आष्टा कासार परिसरात अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरातील प्रमुख चौकांत पोलीस किंवा होमगार्ड तैनात करण्याची मागणी करण्यात आली आहे.