संशोधन केंद्रासाठी प्रसंगी आंदोलन करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:37 IST2021-08-20T04:37:46+5:302021-08-20T04:37:46+5:30

भूम : भूमसारख्या अतिमागास तालुक्यात वनौषधी, कृषी, दूध उत्पादक आदी कुठल्याही प्रकारचे संशोधन केंद्र होणे गरजेचे आहे. त्यामुळे यासाठी ...

Let's agitate for the research center | संशोधन केंद्रासाठी प्रसंगी आंदोलन करू

संशोधन केंद्रासाठी प्रसंगी आंदोलन करू

भूम : भूमसारख्या अतिमागास तालुक्यात वनौषधी, कृषी, दूध उत्पादक आदी कुठल्याही प्रकारचे संशोधन केंद्र होणे गरजेचे आहे. त्यामुळे यासाठी प्रसंगी आंदोलन करावे लागले तर तेही आपण करू, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांनी दिला.

परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त १९७२ साली या विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी फायटर्स संघटनेच्या वतीने तालुक्यातील हाडोंग्री येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉ. व्ही.के. पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून तेलंगणाचे खासदार तथा महाराष्ट्राचे सुपुत्र बी.बी. पाटील, कुलगुरू डॉ. अशोक ढवण, नाशिकचे आयुक्त के.एम. नागरगोजे, डॉ. आशा पाटील, साहाय्यक निबंधक बी.टी. लावंड, परभणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टकसाळे, ॲड. प्रज्ञा तळेकर आदी उपस्थित होते.

या वेळी खासदार बी.बी. पाटील यांनी तेलंगणात शेतकऱ्यांना वीज मोफत असून, विविध योजनांचा लाभही दिला जातो, असे सांगितले. कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी सुवर्ण जयंतीच्या शुभेच्छा देत संशोधन केंद्राच्या मागणीला दुजोरा दिला. प्रस्ताव आल्यानंतर विद्यापीठाकडून योग्य ती मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी सर्वच मान्यवरांनी वनौषधी वृक्ष लागवडीबाबत मार्गदर्शन केले.

Web Title: Let's agitate for the research center