लसींचा तुटवडा, अनेकांना फिरावे लागले माघारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:34 IST2021-04-22T04:34:13+5:302021-04-22T04:34:13+5:30
कळंब : तालुक्यात कोरोना प्रतिबंधित लसीचा साठा संपल्याने अनेकांना लस न घेताच बुधवारी रिकाम्या दंडाने माघारी फिरावे लागले. येथील ...

लसींचा तुटवडा, अनेकांना फिरावे लागले माघारी
कळंब : तालुक्यात कोरोना प्रतिबंधित लसीचा साठा संपल्याने अनेकांना लस न घेताच बुधवारी रिकाम्या दंडाने माघारी फिरावे लागले. येथील उपजिल्हा रुग्णालयातदेखील केवळ १४० जणांना आज दुसरी लस देण्यात आली, तर जवळपास २०० नागरिकांना लस न घेताच परतावे लागले.
कळंब उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी पहिली कोविशिल्ड लस घेतलेल्यांसाठी दुसरी लस घेण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी जवळपास ४०० नागरिकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. मात्र, रुग्णालय प्रशासनाकडे केवळ १४० लस उपलब्ध होत्या. त्यामुळे इतरांना लस न घेताच माघारी फिरावे लागले. दर बुधवारी व रविवारी उपजिल्हा रुग्णालयात कोविशिल्ड लस घेतलेल्यांसाठी दुसऱ्या टप्प्यातील लस दिली जाते. परंतु, येत्या रविवारी लस उपलब्ध होईल का नाही, याबाबतही आज रुग्णालय प्रशासनाने ठोसपणे काही सांगितले नसल्याने लस न मिळालेल्यांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. दुसरीकडे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविशिल्ड लसीचा साठा संपल्याने त्या भागातील लसीकरणावरही त्याचा परिणाम झाला आहे. ग्रामीण भागात लस घ्या म्हणून नागरिकांना प्रोत्साहित करण्यापासून ते त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत आणायची कसरत शासकीय यंत्रणातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना करावी लागत आहे. त्यातच लस नाही, अशी नकारघंटा ऐकली की, लोक पुन्हा लसीकरण केंद्राकडे जाण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र दिसत आहे.
१ मे नंतर ताण वाढणार !
१ मे नंतर १८ वर्षांवरील सर्वांनाच लस देण्याची घोषणा सरकारने केली आहे. सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देताना यंत्रणांची एवढी धांदल उडाली आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील लसीकरण सुरु होईल तेंव्हा काय चित्र असेल, असा सवालही आता लसीकरणमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी विचारत आहेत. त्यामुळे आधी मुबलक लसी उपलब्ध करून लसीकरणासाठी लसीकरण केंद्र व मनुष्यबळ वाढविण्याची मागणी पुढे येत आहे.
चौकट -
कोव्हॅक्सिन उपलब्ध, कोविशिल्ड संपले
उपजिल्हा रुग्णालयात सध्या कोव्हॅक्सिन लस उपलब्ध आहे. परंतु, कोविशिल्ड लस आज संपली आहे. ती कधी उपलब्ध होईल, याबाबत निश्चित सांगता येणार नाही. आज १४० दुसरे डोस दिले. लस संपल्याने इतरांना देता आली नाही. आता कोविशिल्ड लसीचा पुरवठा कधी होईल, हे सांगता येणार नाही. आम्ही प्रशासनाकडे मागणी नोंदविली आहे, अशी माहिती कळंब उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांनी दिली.
कोट-
ग्रामीण भागातील लसीकरणासाठी एक दोन दिवसात कोविशिल्ड लस उपलब्ध होईल. त्यानंतर तालुक्यातील १२ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत लसीकरण पुन्हा चालू होईल. सध्या आम्ही ‘माझे गाव, कोरोनामुक्त गाव’ मोहिमेंतर्गत लसीकरण करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करत आहोत.
- डॉ. प्रदीप जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी
नियोजन आवश्यक
उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण एकाच कक्षात चालू आहे. लसीकरण वेगात होण्यासाठी टेबलची संख्या व कर्मचारी वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी ससेहोलपट थांबेल व अनेकांना एकाच वेळी लस घेता येईल. याकडे रुग्णालय प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन क्षीरसागर यांनी केली.