जलसाक्षरतेचा अभाव
By Admin | Updated: March 23, 2016 01:06 IST2016-03-23T00:52:27+5:302016-03-23T01:06:54+5:30
उस्मानाबाद : पाणी टंचाईने जिल्हा होरपळून निघत आहे. अनेक वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असतानाही नागरिकांमध्ये

जलसाक्षरतेचा अभाव
उस्मानाबाद : पाणी टंचाईने जिल्हा होरपळून निघत आहे. अनेक वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असतानाही नागरिकांमध्ये अद्यापही जलसाक्षरतेचा अभाव असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणातून पुढे आले आहे. टंचाई काळातही ४८ टक्के नागरिकांनी आपण तसेच आपल्या कुटुंबियांकडून पाण्याचा अपव्यय होत असल्याची कबुली दिली आहे.
उस्मानाबाद शहरातील अनेक भागात सात दिवसआड तर काही परिसरात दहा दिवसआड पाणी पुरवठा केला जात आहे. ही परिस्थिती यंदाच्याच उन्हाळ्यातील नाही तर मागील अनेक वर्षापासून उस्मानाबादकर पाणी टंचाईचा सामना करीत आहेत. केवळ उस्मानाबादपुरताच हा विषय मर्यादित नाही तर उमरगा, कळंब, परंडा आदी जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह वाड्या-वस्त्या तहानेने होरपळून निघत आहेत. उपलब्ध पाणीसाठा जास्तीत जास्त दिवस घालविण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी या कामी नागरिकांचाही पुढाकार महत्वाचा आहे. मात्र नेमके याच ठिकाणी अनेकजण कमी पडत असल्याचे चित्र दिसून येते. जलसाक्षरतेच्या अनुषंगाने ‘लोकमत’ने प्रश्नावलीच्या माध्यमातून शहरातील नागरिकांची मते जाणून घेतली. तसेच जलसाक्षरतेबाबत नागरिक किती सजग आहेत याचा आढावा घेतला असता, जलसाक्षरतेसंदर्भात अधिक जनजागरणाची आवश्यकता असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. आपण तसेच आपल्या कुुटुंबियांकडून टंचाई काळातही पाण्याचा अपव्यय केला जातो, असे आपणास वाटते का? असा थेट प्रश्न नागरिकांना विचारण्यात आला होता. विशेष म्हणजे यावर तब्बल ४८ टक्के नागरिकांनी होय पाण्याचा अपव्यय होतो, अशी स्पष्ट कबुली दिली आहे. तर काही प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो असे सांगणाऱ्या नागरिकांची संख्या २५ टक्के असून, २७ टक्के नागरिकांनी मात्र आमच्याकडून पाण्याचा जपून वापर केला जातो असे नमूद केले आहे. याच नागरिकांना ‘लोकमत’ने घर तसेच परिसरातील नळांना तोट्या बसविलेल्या आहेत काय? याची खातरजमा करता काय असा प्रश्न विचारला होता. यावरही ५८ टक्के नागरिकांनी नाही असे उत्तर दिले. तर होय खातरजमा करतो असे म्हणणाऱ्या नागरिकांची संख्या २१ टक्के असून, तेवढ्याच म्हणजे २१ टक्के नागरिकांनी कधी-कधी आम्ही नळांना तोट्या आहेत का हे तपासतो, असे सर्व्हेक्षणावेळी स्पष्ट केले.
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात होणाऱ्या पाणी उपशाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच शेतीसाठी पाणीवापर करताना तूषार अथवा ठिबक प्रणाली बंधनकारक करायला हवी असा विचार मागील काही वर्षापासून विविध स्तरावर चर्चिला जात आहे. या अनुषंगाने नागरिकांना काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून करण्यात आला. त्यावर तब्बल ७३ टक्के नागरिकांनी होय शेतीसाठी तूषार अथवा ठिबक प्रणाली बंधनकारक करायला हवी असे म्हटले आहे. तर २७ टक्के नागरिक मात्र ही प्रणाली बंधनकारक करण्याविरोधात असल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)