पावसाअभावी खाेळंबली पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST2021-06-18T04:23:15+5:302021-06-18T04:23:15+5:30
परंडा : पुरेशा पावसाअभावी तालुक्यातील खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने देखील जोपर्यंत सर्वदूर सलग दोन ते ...

पावसाअभावी खाेळंबली पेरणी
परंडा : पुरेशा पावसाअभावी तालुक्यातील खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने देखील जोपर्यंत सर्वदूर सलग दोन ते तीन दिवस ताेही ८० ते १०० मिलीमीटरपर्यंत पाऊस पडत नाही, तोपर्यंत पेरण्या करू नयेत, असे आवाहन केले आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
मागील आठ दिवसांपासून तालुक्यात पावसाचे कमी-अधिक प्रमाण राहिले आहे. मात्र, सर्वदूर पाऊस नसल्याने खरीप पेरण्या खाेळंबल्या आहेत. परंडा तालुक्यात सरासरी पर्जन्यमान ६२५ मिलीमीटर आहे. आतापर्यंत संपूर्ण तालुक्यात केवळ ५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील जवळा, सिरसाव, भांडगाव, चांदणी परिसरात खास करून कपासी, मूग, उडीदची लागवड मोठ्या प्रमाणात होते. कुभेंजा, भोंजा, सोनारी, कंडारी या भागात सोयाबीनचे पीक घेतले जाते. मात्र, अत्यल्प पावसावर पेरणी केल्यास बियाणाची उगवण हाेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते. त्यामुळेच कृषी विभागाने किमान १०० मि.मी. पाऊस हाेत नाही, ताेवर पेरणी करू नये, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.
चौकट....
यंदाच्या खरीप हंगामात सुमारे ३९ हजार ५४ हेक्टरवर सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद आदी पिकांची लागवड होणार असून त्यासाठी एकूण १ हजार १०० क्विंटल बियाणे लागण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. सन २०२१-२२ खरीप हंगामात ३९ हजार ५४ हेक्टरपैकी ३ हजार २६१ हेक्टर क्षेत्र कापूस पिकासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. १६ हजार ३८३ हेक्टर क्षेत्र तुरीसाठी प्रस्तावित असून उडीद पिकासाठी १८ हजार ७३० हेक्टर तर उर्वरित क्षेत्र इतर पिकांसाठी प्रस्तावित आहे.
चौकट....
पेरणीसाठी शेतजमिनी तयार करा......
शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, सध्या तुरळक पाऊस पडत आहे. सोयाबीन, तूर, उडीद, भुईमूग व मका आदी पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी व वाखराच्या पाळ्या देऊन तयार करावी. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास बियाणे वाया जाऊ शकते. ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरून वाढते.
- महारुद्र मोरे,
तालुका कृषी अधिकारी, परंडा