पाथरूड परिसरात कांदा बियाणाचीही टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:22 IST2021-06-17T04:22:43+5:302021-06-17T04:22:43+5:30
नामांकित बियाणे मिळेना -दर पाेहाेचला पावणेतीन हजारांवर पाथरुड: भूम तालुक्यातील पाथरुड परिसरात रोहिणी व मृग नक्षत्रात कमी-अधिक प्रमाणात ...

पाथरूड परिसरात कांदा बियाणाचीही टंचाई
नामांकित बियाणे मिळेना -दर पाेहाेचला पावणेतीन हजारांवर
पाथरुड: भूम तालुक्यातील पाथरुड परिसरात रोहिणी व मृग नक्षत्रात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकरी पावसाळी कांदा लागवडीच्या तयारीला लागले आहेत. परंतु सध्या कृषी दुकानांमध्ये मागणीच्या तुलनेत विविध नामांकित कंपन्यांचे कांदा बियाणे उपलब्ध नाही. बियाणे घेण्यासाठी कृषी दुकानांमध्ये गेलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहेत. तर काही शेतकरी अन्य जिल्ह्यांतून बियाणे उपलब्ध करू लागले आहेत.
मागील काही वर्षांत भूम तालुक्यातील पाथरुड परिसरातील पाथरुडसह जेजला, आनंदवाडी, सावरगाव, अंतरवली, जयवंतनगर आदी गावातील शेतकरी कांदा लागवडीकडे वळले आहेत. पावसाळ्यात पाण्याची टंचाई नसते. त्यामुळे कांदा पिकाला मुबलक पाणी मिळते. परिणामी उत्पादनही चांगले मिळते. दरम्यान, यासाठी मे-जून महिन्यापासून शेतकरी तयारी करतात. पेरणी व बियाणे टाकून रोपे तयार करून पुन्हा लागवड करणे अशा दोन पद्धतीचा अवलंब केला जातो. अधिकतर शेतकरी बियाणे शेतात टाकून रोपे तयार करूनच कांद्याची लागवड करतात. अशा पद्धतीने लागवड केलेल्या कांद्याची वाढ चांगली हाेऊन उत्पादनही अधिक मिळते. विशेष म्हणजे, पावसाळी कांद्याला बाजारपेठेत दरही अधिक मिळताे. त्यामुळे बहुतांश शेतकरी पावसाळी कांदा लागवड करतात. मात्र, सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बियाणे टंचाईला सामाेरे जावे लागत आहे. नामांकित कंपन्यांचे बियाणे पाथरूडसह परिसरातील कृषी केंद्रामध्ये उपलब्ध नाही. थाेडेबहुत बियाणे मिळालेच तरी अवघ्या काही तासात ते संपते. त्यामुळे कांदा लागवड लांबणीवर पडते की काय, अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जाऊ लागली आहे.
चाैकट..
बियाणाचे दर वाढले...
कांदा बियाणाची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळेच की काय, यंदा दरही वाढले आहेत. नामांकित कंपनीच्या एक किलाे बियाणासाठी पावणेतीन ते तीन हजार रुपये माेजावे लागत आहेत. परिणामी उत्पादन खर्चात वाढ हाेणार असल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
काेट....
कांदा बियाणाची बुकिंग केलेली आहे. परंतु मागणीच्या तुलनेत कांदा बियाणे उपलब्ध होत नसल्याने कांदा बियाणे घेण्यासाठी आलेल्या अनेक शेतकऱ्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे.
-बाळासाहेब पिंपळे, कृषी सेवा केंद्र, बावी.