मैदानाअभावी क्रीडा विकासाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:31 AM2021-03-05T04:31:56+5:302021-03-05T04:31:56+5:30

(फोटो : समीर सुतके ०४) उमरगा : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयातील खेळाडू मूलभूत सोयी-सुविधा नसतानाही विविध क्रीडा ...

Lack of field breaks sports development | मैदानाअभावी क्रीडा विकासाला ब्रेक

मैदानाअभावी क्रीडा विकासाला ब्रेक

googlenewsNext

(फोटो : समीर सुतके ०४)

उमरगा : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयातील खेळाडू मूलभूत सोयी-सुविधा नसतानाही विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चमकत आहेत. परंतु, शहरात या खेळाडूंना हक्काचे मैदान नसल्यामुळे क्रीडा विकासाला मर्यादा येत असल्याचे दिसून येते.

शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून, शहराची लोकसंख्या पाऊण लाखाच्या आसपास पोहोचली आहे. शहरात पाच माध्यमिक शाळा व दोन महाविद्यालये आहेत. यात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु, शहरात क्रीडा संस्कृती म्हणावी तशी रुजलीच नाही. शहरात एकही प्रशस्त असे क्रीडा संकुल नसल्यामुळे या खेळाडूंना खासगी विद्यालयाचे मैदान अथवा शहराबाहेरील पडीक जागेवर सराव करावा लागत आहे. तसेच पोलीस, सैन्य भरती व ॲथलेटिक्ससारख्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या युवक, युवतींना खड्डे असलेल्या रस्त्यावरून व शेत शिवारात जाऊन सराव करावा लागतो.

उमरगा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयातील खेळाडू मूलभूत सोयी-सुविधा नसतानाही विविध स्पर्धांमध्ये मिळवित आहेत. मात्र, खेळाडूंना खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी क्रीडा संकुल आणि मूलभूत सोयी-सुविधाची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन नगर पालिकेतील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी सन २००९ मध्ये शासनाकडे शहराचा नवीन विकास आराखड्याचा प्रस्ताव दाखल केला होता. त्याला २०१३ साली मंजुरी मिळाली. या विकास आराखड्यात जुन्या हद्दवाढीतील डिग्गी रोड भागात साडेपाच एकर जागा क्रीडा संकुलासाठी ठेवण्यात आली होती. यासाठी जागा मालकाला नगर परिषदेने मोबदला द्यावयाचा होता. या अनुषंगाने तत्कालीन नगराध्यक्ष रझाक अत्तार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविल्या जात असलेल्या ‘अर्बन डेव्हलपमेंट सिक्स योजनेंतर्गत’ मोबदला देण्यासाठी अनुदान प्राप्तकर्ज मिळावे म्हणून प्रस्ताव पाठविला होता. मात्र, भूसंपादन विभागाने ही जागा संपादित करून पालिकेच्या ताब्यात न दिल्याने ही प्रक्रिया रखडली आहे.

दरम्यान, यानंतर पालिकेतील नवीन सत्ताधाऱ्यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये पुन्हा ठराव घेऊन शहरात भाजी मंडईसाठी आरक्षित असलेल्या जागेत हे क्रीडा संकुल बांधण्याचा ठराव घेतला आहे. यासाठी शासनाने या जागेवरील भाजी मंडईचे आरक्षण उठवून क्रीडा संकुलसाठी ही जागा देणे गरजेचे आहे. मात्र हे शक्य नसल्याचे काहींचे म्हणणे आहे. एकूणच पालिकेने क्रीडा संकुलचा आराखडा तयार करून ठेवला असला तरी जागाच उपलब्ध नसल्याने या आराखड्याला कोणतेही महत्त्व राहिलेले नाही. सध्या शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर काही खेळाडू सराव करताना दिसतात. मात्र, या व्यतिरिक्त शहरात एकही मैदान नसल्याने खेळाडूंची गैरसोय होत आहे.

गुंजोटीतील संकुलासाठी पाच कोटींची मंजुरी

उमरगा शहरात जागा नाही मिळाल्याने तालुक्यातील गुंजोटी येथील श्रीकृष्ण महाविद्यालयात तालुका क्रीडा संकुल सुरू केले असून, आ. ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नातून तेथील विविध विकास कामांसाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून तालुका क्रीडा संकुलात राष्ट्रीय दर्जाचे मल्टीपर्पज हॉल, अंतर्गत रस्ते, पथदिवे, ड्रेनेज व्यवस्था, सार्वजनिक शौचालय आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मल्टीपर्पज हॉलमध्ये जिल्हा क्रीडा संकुलाच्या धर्तीवर मॅटवरील खो-खो, कबड्डी, लॉग टेनिस, बास्केटबॉल आदी खेळांची सुविधा राहणार आहे. याच बरोबर मैदानी खेळांसाठी खो-खो व कबड्डीचे स्वतंत्र मैदानही बनविण्यात येणार आहे. असे असले तरी येथे तालुक्यातील इतर गावातील खेळाडूंना येऊन सराव करताना मर्यादा येत आहेत. त्यामुळे उमरगा शहरात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असलेले क्रीडा संकुल होणे गरजेचे आहे.

सध्या वापरात नसलेल्या भाजी मंडईचे आरक्षण उठवून तेथील रिकाम्या जागेत मिनी क्रीडा संकुल व कॉम्प्लेक्स बांधण्याबाबतचा प्रस्ताव पालिकेने मंजूर केला आहे. तो प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. आमचा पाठपुरावा सुरू आहे. लवकरच त्यास मंजुरी मिळेल व सोयी-सुविधायुक्त क्रीडा संकुल तयार करण्यात येईल.

-प्रेमलता टोपगे, नगराध्यक्षा, उमरगा

शहरात क्रीडा संकुल नसल्याने मला अतिरिक्त खर्च करून बाहेर गावी जाऊन सराव करावा लागतो. तालुका क्रीडा संकुल गुंजोटीला बांधण्यात आले असून, ते लांब असल्याने तेथे सराव करणे शक्य नाही. भविष्याचा विचार करता उमरगा शहरात एक सुसज्ज क्रीडा संकुल होणे खूप गरजेचे आहे.

- आर्या वाले, राष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू, उमरगा

फोटो- उमरगा शहरात असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या याच मैदानाचा वापर सध्या खेळाडू सरावासाठी करीत आहेत.

Web Title: Lack of field breaks sports development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.