कृषी कायद्यांविरुद्ध विरोधकांची कोल्हेकुई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST2021-07-09T04:21:47+5:302021-07-09T04:21:47+5:30
उस्मानाबाद : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात विरोधक हकनाक ओरड करीत आहेत. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे हितच साधले जाणार ...

कृषी कायद्यांविरुद्ध विरोधकांची कोल्हेकुई
उस्मानाबाद : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात विरोधक हकनाक ओरड करीत आहेत. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे हितच साधले जाणार आहे. मात्र, विरोधकांनी आपले साम्राज्य धोक्यात येईल, अशी अनाठायी भीती बाळगून कायद्यांच्या विरोधात कोल्हेकुई सुरू केली असल्याचा आरोप भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी गुरुवारी येथे केला.
किसान मोर्चाच्या वतीने राज्यभरात शेतकरी संवाद अभियान सुरू करण्यात येत आहे. त्याची सुरुवात तुळजापुरात देवीचे दर्शन घेऊन करण्यात आली. यानंतर उस्मानाबादेत पत्रकारांशी संवाद साधताना वासुदेव काळे म्हणाले, मोदी सरकारने घेतलेल्या शेतकरी हिताचे निर्णय सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या सूचनाही नोंदवून घेण्यात येणार आहेत. मोदी सरकारने २२ कोटी शेतकऱ्यांचे माती परीक्षण करून दिले. त्यामुळे रासायनिक खताचा वापर ८ ते १० टक्के कमी झाला आहे. ११ कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीच्या माध्यमातून मदत केली जात आहे. सिंचन योजना, पीक विम्याच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना मोलाची मदत होत आहे. असे असतानाही विरोधक कायद्याचा बाऊ करून सांगत आहेत. बाजार समित्या धोक्यात येतील, असे सांगितले जात आहे. मात्र, निकोप स्पर्धा केल्यास समितीला कोणताही धोका नाही. मात्र, त्यांना शेतकरी हित नकोच आहे. विम्याच्या बाबतीतही तसेच आहे. गतवर्षी १ कोटी ३८ लाख शेतकऱ्यांनी विमा भरला होता. त्यापैकी केवळ १५ लाख शेतकऱ्यांना भरपाई मिळाली आहे. हे सरकार शेतकरी हितापेक्षा कंपनी हिताला व वसुलीला प्राधान्य देणारे असल्याची टीकाही काळे यांनी केली. यावेळी किसान मोर्चाचे मकरंद कोरडे, सुधाकर भोयर व रंगनाथ सोळंकी यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नेताजी पाटील, प्रदेश कार्यकारी सदस्य व्यंकटराव गुंड, खंडेराव चौरे, सरचिटणीस नितीन भोसले, रामदास कोळगे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, ओबीसी मोर्चाचे विजय शिंगाडे, तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, राजाभाऊ पाटील, राजेंद्र पाटील, राजकुमार पाटील, नानासाहेब कदम, साहेबराव घुगे, मकरंद पाटील, शिवाजीराव गिड्डे, अभय इंगळे, पूजा देडे, इकबाल मुल्ला, बालाजी सोनटक्के, गजानन वडणे व पदाधिकारी उपस्थित होते.