खवा, पेढा उत्पादन पुन्हा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:32 IST2021-04-08T04:32:46+5:302021-04-08T04:32:46+5:30
पाथरुड : हजारो तरुणांच्या हाताला रोजगार देऊन अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह भागविणारा पाथरुड येथील खवा, पेढा व्यवसाय कोरोनाच्या पहिल्या ...

खवा, पेढा उत्पादन पुन्हा ठप्प
पाथरुड : हजारो तरुणांच्या हाताला रोजगार देऊन अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह भागविणारा पाथरुड येथील खवा, पेढा व्यवसाय कोरोनाच्या पहिल्या लाटेतून कसाबसा सावरत असतानाच, पुन्हा दुसऱ्या लाटेमुळे ठप्प झाला आहे. यामुळे पेढा उत्पादकांसह, पेढा विक्रेते, दुग्ध व्यावसायिक शेतकरी अशी पेढा व्यवसायाची सर्वच साखळी पुन्हा संकटात सापडली आहे.
गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत महाराष्ट्रासह देशातील सर्वच देवस्थाने बंद केल्याने राज्यासह देशातील काही भागात पोहोचलेल्या पाथरुड येथील पेढा व्यवसायाला मोठा फटका बसला होता. पेढा व्यवसाय बंद पडल्याने हजारो पेढा विक्रेत्यांसह शेकडो कुंटुबांच्या हातचे काम बंद पडले होते. यामुळे येथील पेढा व्यवसायातून होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. अनलॉकनंतर मागील काही महिन्यांपासून येथील पेढा व्यवसाय पूर्वपदावर येऊ लागला होता. पाथरुडसह परिसरातील जवळपास २० ते २५ गावांमधून दिवसाकाठी ४ टन खवा येथील ४६ पेढा भट्ट्यांवर येऊ लागला होता. यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या दुधाला प्रती लिटर २० रुपये मिळणारा भाव तीस रुपयांवर गेला. शिवाय, खव्याचा दरही दीडशे रुपयांपर्यंत पोहोचला होता. यानिमित्ताने दुग्ध व्यवसायदेखील हळूहळू पूर्वपदावर येत होता. मात्र, पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याने महाराष्ट्रासह देशातील प्रमुख देवस्थाने बंद झाली. त्यामुळे पेढा विक्री ठप्प होऊन पाथरुडसह परिसरात दररोज होणाऱ्या ४ टन खवा, पेढा निर्मितीला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. यामुळे पेढा उत्पादकांसह या व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांचा रोजगार बंद पडला असून, हजारो पेढा विक्रेत्यांसह दुग्ध उत्पादक शेतकरी, पेढा उत्पादक अडचणीत आले आहेत.
कोट......
माझ्याकडे दररोज ७०० ते ८०० लिटर दूध उपलब्ध होते. त्यापासून दोनशे किलो खवा तयार करून त्यानंतर मागणीनुसार पेढा तयार केला जातो. परंतु, पुन्हा एकदा मंदिरे बंद केल्याने खवा, पेढा तयार करणे बंद केले आहे. शेतकऱ्यांकडून दूध, खवा घेणेही थांबविले आहे. त्यामुळे पेढा उत्पादक प्रचंड अडचणीत आले आहेत. बँकांचे कर्ज कसे फेडायचे, हा प्रश्न आहे. सरकारने पेढा उत्पादकांना मदत करण्याची गरज आहे.
- समाधान दळवी, पेढा उत्पादक, पाथरुड.
बऱ्यापैकी सुरू झालेली पेढाविक्री पुन्हा एकदा मंदिरे बंद झाल्याने ठप्प झाली. त्यामुळे हातचे काम बंद पडले आहे.
- तात्या भसाड, पेढा विक्रेते सप्तसृंगीगढ
दुधाचे दर घसरले
पाथरुड भागातील दुग्ध व्यवसाय हा पाथरुड येथील पेढा व्यवसायावर अवलंबून आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत पाथरुड येथील पेढा व्यवसाय बंद होताच, दुधाचे भावही वीस रुपयांवर आले होते. मागील काही दिवसांपासून पेढा उत्पादन वाढल्यामुळे दुधाचे दर तीस रुपयांवर, तर खव्याचे दर दीडशे रुपयांवर गेले होते. मात्र, पुन्हा पेढा व्यवसाय बंद पडल्याने दुधाच्या भावात घसरण होऊ लागल्याने दुग्ध उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
४६ भट्ट्यांवर दररोज ४ टन खवा उत्पादन
पाथरुड येथे ४६ पेढा भट्ट्यांवर दररोज जवळपास चार टन खवा, पेढा तयार केला जातो. हा तयार झालेला खवा, पेढा महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांवर विकला जातो. वर्षातील चैत्र, नवरात्र याकाळात यात्रा असल्याने पेढ्याची मोठी विक्री होते. मात्र गेल्यावर्षी व यंदाही कोरोनाची दहशत कायम असल्याने पाथरुड येथील पेढा व्यवसायाची कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याने पेढा उत्पादकांसह या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अडीच हजार पेढा विक्रेत्यांसह शेकडो कुटुंबे, दुग्धउत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.