खरीप अतिवृष्टीत वाहिली, रब्बी पिके अवकाळीत गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:34 IST2021-02-20T05:34:23+5:302021-02-20T05:34:23+5:30
खरीप हातातून गेल्यानंतर शेतकऱ्यांनी रब्बीवर मोठी आशा ठेवली होती. पोषक वातावरण व पाण्याची मुबलकता, यामुळे शेतकऱ्यांनी रात्र-रात्र जागून पाणी ...

खरीप अतिवृष्टीत वाहिली, रब्बी पिके अवकाळीत गेली
खरीप हातातून गेल्यानंतर शेतकऱ्यांनी रब्बीवर मोठी आशा ठेवली होती. पोषक वातावरण व पाण्याची मुबलकता, यामुळे शेतकऱ्यांनी रात्र-रात्र जागून पाणी देत पिके जोपासली होती. विशेषत: ज्वारी, हरभरा अन् गव्हावर शेतकऱ्यांनी कडाक्याच्या थंडीतही मोठी मेहनत घेतली. यानंतर आता सध्या या तिन्ही पिकांच्या काढणीचा हंगाम सुरु झाला आहे. पाणी दिलेली पिके जोमात आल्याने चांगल्या उत्पन्नाची आस शेतकऱ्यांना होती. अनेकांनी हरभरा, गहू व ज्वारीची काढणी सुरू केली. काहींनी गंजी लावल्या तर काही शेतकऱ्यांची काढणी झालेली पिके अजून गोळा करायची राहिली होती. त्यातच वातावरण बदलले. बुधवारी रात्री हलका पाऊस झाला; तर गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस. यामुळे काढून ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाले. शिवाय, उभ्या ज्वारी व गव्हाने जागीच लोळण घेतली.
विम्यासाठी करा अर्ज...
रब्बी हंगामातील पिकांचा ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे, त्यांना कंपनीच्या अटीनुसार ऑनलाईन अर्ज ७२ तासांच्या आत करणे आवश्यक आहे. खरीप हंगामात केवळ अर्जाअभावी हजारो शेतकरी विम्यापासून वंचित राहिले. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तातडीने अर्ज करावा.