काेराेना पावला, आठवीपर्यंतचे २ लाखावर विद्यार्थी विनापरीक्षा पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:28 IST2021-04-05T04:28:36+5:302021-04-05T04:28:36+5:30
उस्मानाबाद : काेराेनाची पहिली लाट ओसरल्यानंतर टप्प्याटप्याने शाळा सुरू करण्यात आल्या हाेत्या. परंतु, काेराेनाची दुसरी लाट धडकल्यानंतर पुन्हा बाधितांची ...

काेराेना पावला, आठवीपर्यंतचे २ लाखावर विद्यार्थी विनापरीक्षा पास
उस्मानाबाद : काेराेनाची पहिली लाट ओसरल्यानंतर टप्प्याटप्याने शाळा सुरू करण्यात आल्या हाेत्या. परंतु, काेराेनाची दुसरी लाट धडकल्यानंतर पुन्हा बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. संसर्ग राेखण्यासाठी पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पहिली ते आठवी वर्गाच्या परीक्षा न घेता, त्यांना पास करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा जिल्हाभरातील सुमारे २ लाखावर विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे.
काेराेनाची पहिली लाट ओसरल्यानंतर शाळांसाेबतच अन्य सेवाही सुरू झाल्या हाेत्या. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांनीही सुटकेचा श्वास साेडला हाेता. असे असतानाच जिल्ह्यात दुसरी लाट दाखल झाली. त्यामुळे दिवसागणिक काेराेना बाधितांच्या संख्येत प्रचंड गतीने वाढ हाेत आहे. काेराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने शाळा बंद करण्याचा आदेश दिला. त्यामुळे आजघडीला जिल्हाभरातील सर्व शाळा बंद आहेत. दरम्यान, काेराेनाचा धाेका कधी टळेल, हे काेणालाही सांगता येत नाही. त्यामुळे राज्य शासनाने पहिली ते आठवी वर्गाच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी घाेषणा मंत्र्यांनी केली आहे. या निर्णयाचा जिल्ह्यातील २ लाख ७ हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. हे सर्व विद्यार्थी परीक्षेविनाच उत्तीर्ण झाले आहेत. असे असले तरी पालकांतून मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
प्रतिक्रिया...
पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करण्याचा निर्णय चुकीचा आहे. काेराेनामुळे सध्या शिक्षण ऑनलाईन सुरू आहे. त्यामुळे परीक्षाही ऑनलाईन घेऊन विद्यार्थांनी केलेल्या अभ्यासाचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे. अशाप्रकारे परीक्षा न घेता पास करणे त्या विद्यार्थासाठी घातक आहे.
- भगवान पाटील,
शिक्षणतज्ज्ञ, लोहारा
शिक्षण विभागाने आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्याना विनापरीक्षा पास करण्याचा निर्णय घेतला असला तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेच आहे. ते कधी भरून निघणारे नाही. त्यामुळे पास केले काय आणि नापास केले काय फरक काही पडणार नाही.
- संभाजी पोतदार,
पालक, लोहारा
कोरोनामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ते भरून न निघणारे आहे. अशा परिस्थितीत शासन तरी काय करणार? त्यामुळेच आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पास करण्याचा निर्णय घेतला. सध्या अनेकांना पाठीमागील वर्गाचेच काही येत नाही. तर पुढच्या वर्गात जाऊन तरी विद्यार्थी काय करणार?
- शरद पवार,
पालक, लोहारा.
जिल्ह्यातील विद्यार्थी...
वर्ग विद्यार्थी संख्या
१ ली २५६१९
२ री २६५८३
३ री २५९९३
४ थी २६४३३
५ वी २५७५५
६ वी २६०३७
७ वी २५५४७
८ वी २५३१८