उस्मानाबाद : कळंब - लातूर रस्त्याचे हायब्रीड ॲन्युटी योजनेअंतर्गत चालू असलेले काम सध्या बंद आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीस मोठी अडचण निर्माण झाली आहे. हे काम तत्काळ चालू करावे, अन्यथा राष्ट्रवादीच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सन २०१९-२० मध्ये कळंब - लातूर रस्त्याचे काम हायब्रीड ॲन्युटी योजनेअंतर्गत चालू झाले होते. परंतु, गेल्या अनेक दिवसांपासून हे काम बंद आहे. यामुळे काही ठिकाणी एका बाजूने काम पूर्ण झाले व दुसऱ्या बाजुला खडी अंथरुन रस्ता खोदून ठेवला आहे. काही भागात रस्ता केवळ उकरुन ठेवला आहे. या सर्व प्रकारामुळे डिकसळ ते रांजणी या साखर कारखाना पट्ट्यातील शेतकरी, कर्मचारी, कामगार व अन्य व्यावसायिकांची प्रचंड अडचण होऊन अपघातही घडत आहेत.
या रस्त्याचे बंद झालेले काम त्वरित सुरु करावे, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, कळंब तालुकाध्यक्ष श्रीधर भवर, उपसभापती गुणवंत पवार, संतोष पवार, शाहुराज खोसे, सुरेश टेकाळे, पद्माकर पाटील, सुरेश पाटील, विनायक कवडे, भारत शिंदे, विश्वनाथ धुमाळ, भाऊसाहेब पाटील, अरुण पवार, किरण खोसे, संग्राम खोसे, राजकुमार कवडे, प्रवीण शिंदे, सागर चिंचकर, राहुल माळकर, तुषार वाघमारे, नवनाथ मोरे, अच्युत शिंदे, अजित शिंदे, दिनकर शिंदे, सुग्रीव जाधवर, जगदीशचंद्र जोशी, शशिकांत लोमटे आदींच्या सह्या आहेत.