उस्मानाबाद/तुळजापूर : तुळजापूर शहरासह परिसरातील गावांचे अर्थकारण मुख्यत: तुळजाभवानी मंदिरावर अवलंबून आहे. मात्र, मंदिरच बंद असल्याने छोटे व्यावसायिक व पुजाऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. एकीकडे बस, रेल्वेमधून तासन् तासांचा एकत्रित प्रवास चालतो. मग धार्मिक स्थळेच यांना अडचणीची का वाटतात?, असा घणाघात गुरुवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापुरात केला.
मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी पुजारी मंडळाच्यावतीने तुळजापुरात साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणात सहभागी होत आ. पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केला. ते म्हणाले, देशातील इतर राज्यात धार्मिक स्थळे खुली आहेत. राज्यात मात्र धार्मिक स्थळे खुली करण्यास परवानगी नाही. यामुळे मंदिरावर उपजीविका अवलंबून असणाऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. तुळजापूर येथे आई तुळजाभवानी मातेचे शक्तिपीठ असून, मागील दीड वर्षापासून मंदिर जवळपास बंदच आहे. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून भाविकांसाठी मंदिर खुले करणे शक्य आहे. मात्र, तशी यांची इच्छाशक्तीच दिसत नाही. तुळजापूर देवस्थानचा प्रशाद योजनेमध्ये समावेश करणे, तसेच रेल्वेसाठी राज्याच्या हिश्श्यापोटी देय रकमेची तरतूद करणे यासारखी मोठी विकास कामे राज्य सरकारच्या स्तरावर प्रलंबित आहेत. प्रशाद योजनेच्या माध्यमातून या भागाचा कायापालट होणार आहे. ही योजना संपूर्णत: केंद्रशासन अर्थसहाय्यित असून, राज्य सरकारने केवळ प्रस्ताव सादर करायचा आहे. अनेकवेळा मागणी करूनही याबाबत बैठक बोलावली जात नाही. सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी निम्म्या वाट्याचे हमीपत्र देऊनही निधीची तरतूद केली जात नाही. यासाठी राज्य सरकारचे सहकार्य अपेक्षित आहे. या तीनही विषयांबाबत सर्वपक्षीय शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे आवाहन आ. पाटील यांनी उपोषणकर्त्यांना संबोधित करताना केले. राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील असून, तुळजाभवानी देवीचे निस्सीम भक्त असल्याने ते निश्चितच सहकार्य करतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.