दागिने, मोबाईल चोरास ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:36 IST2021-09-27T04:36:19+5:302021-09-27T04:36:19+5:30
उस्मानाबाद : विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून सोन्याचे दागिने, मोबाईल, दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २५ सप्टेंबर रोजी ...

दागिने, मोबाईल चोरास ठोकल्या बेड्या
उस्मानाबाद : विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून सोन्याचे दागिने, मोबाईल, दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २५ सप्टेंबर रोजी पाटोदा पाटी येथून ताब्यात घेतले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील मालाविषयीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्था. गु. शा.चे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोउपनि पांडुरंग माने, पोना अमोल चव्हाण, पोकाँ आरसेवाड, मरलापल्ले, कोळी, गोरे यांचे पथक २५ सप्टेंबर रोजी पहाटे गस्तीस होते. यावेळी पथकास गोपनीय माहिती मिळाली की, पाटोदा पाटी येथील अजय दिलीप भोसले हा काही दिवसांपासून चोरीचे सोन्याचे दागिने, भ्रमणध्वनी व मोटारसायकलसह संशयितरित्या असल्याचे समजले. यावर पथकाने अजय भोसले यास ताब्यात घेऊन तपासणी केली. तपासणीत ढोकी पोलीस ठाणे ३, उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाणे १, उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे १, शिराढोण पोलीस ठाणे १, बेंबळी पोलीस ठाणे परिसरातील १ अशा ७ चाेऱ्या व घरफोडीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला हा आरोपी असल्याचे उघड झाले. पथकाने त्याच्या ताब्यात असलेले ६० ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, दुचाकी व मोबाईलबाबत मालकी-ताबा याविषयी विचारणा केली असता, त्याच्याकडून समाधानकारक माहिती मिळाली नाही. यावर पथकाचा संशय बळावल्याने त्यांनी त्याच्या ताब्यातील दुचाकी सांगाड्याच्या इंजिन क्रमांकाच्या साहाय्याने तसेच मोबाईलच्या आयएमईआय क्रमांकाच्या आधारे तांत्रिक तपास केला. यात नमूद चोरीचा माल हा उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे, उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाणे, तामलवाडी पोलीस ठाणे अशा ३ गुन्ह्यांत चोरीस गेला असल्याचे निष्पन्न झाले. यावर पोलिसांनी अजय भोसले यास चोरीच्या दुचाकी, मोबाईल व सोन्याच्या दागिन्यांसह ताब्यात घेतले असून त्याच्या उर्वरित साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक नीवा जैन यांनी पथकाचे कौतुक केले.