जावा-जावा, आजोबा-नातू, भावांमध्येही रंगला सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:26 IST2021-01-13T05:26:03+5:302021-01-13T05:26:03+5:30

जिल्ह्यातील एकूण ४२८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. यातील ४० ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या असल्याने उर्वरित ३८८ ...

Java-Java, grandfather-grandson, brothers also face color | जावा-जावा, आजोबा-नातू, भावांमध्येही रंगला सामना

जावा-जावा, आजोबा-नातू, भावांमध्येही रंगला सामना

जिल्ह्यातील एकूण ४२८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. यातील ४० ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या असल्याने उर्वरित ३८८ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान होत आहे. यासाठी प्रशासनही सज्ज झाले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक ही गावपातळीवरील महत्त्वाची निवडणूक मानली जाते. या निवडणुकीत नेहमीच नात्या-गोत्याच्या लढती रंगतात. कुठे चुलता-पुतण्या, कुठे जावा-जावा, कुठे सासू-सून, कुठे सासू-सासरे अशा नात्यांतील उमेदवार एकमेकांसमोर दंड थोपटून उभे आहेत. यामुळे गावा-गावांत होणाऱ्या या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार, याची चर्चा सध्या गावा-गावांत रंगत आहे.

चौकट....

दीर-भावजयीत लढत

उस्मानाबाद तालुक्यातील लासोना येथे वाॅर्ड क्र. २मध्ये व्यंकट पाटील व निळकंठ पाटील हे चुलते-पुतणे आणि वाॅर्ड क्र. ३मध्ये चंद्रकला पवार व दत्तू पवार या दीर-भावजयीत लढत होत आहे. तसेच तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (खुर्द) येथेही वाॅर्ड क्रमांक २ मध्ये सख्खे चुलतभाऊ असलेले अविनाश पवार आणि रामदास पवार हे आमने-सामने आहेत.

जावांमध्ये सामना

लोहारा तालुक्यातील भातागळी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमधून दत्ता हजारे व भगवान हजारे या सख्ख्या चुलत भावांत लढत होत आहे. विशेष म्हणजे ही दोन्ही कुटुंबे एकत्रच राहतात. तसेच याच ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमाक तीनमधून सोनाली माने सुषमा माने या जावा-जावा एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या आहेत.

आजोबांच्या विरोधात नातू अजमावतोय नशीब

तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत वाॅर्ड क्र १ मध्ये अटीतटीची निवडणूक होत आहे. या ठिकाणी

जय मल्हार पॅनेलमधून आजोबा माणिक आलुरे विरुद्ध नातू संजीव आलुरे हे अपक्ष तसेच त्यांचे पुतणे अण्णासाहेब आलुरे हेही अपक्ष म्हणून एकमेकांसमोर उभे आहेत. त्यामुळे या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुतण्याचे आव्हान

कळंब तालुक्यातील येरमाळा येथील माजी सरपंच विकास बारकूल हे वाॅर्ड क्र. चार मधून निवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी त्यांच्या विरोधात त्यांचे पुतणे सुहास बारकूल हे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याच वाॅर्डमधून शिवसेनेकडून विलास थोरबोले हे निवडणूक लढवत असून, तेही विकास बारकूल यांचे आतेभाऊ आहेत. याच ग्रामपंचायतीत वनमाला भास्कर कळसाईत व शोभा विकास कळसाईत या जावा-जावा एकमेकांसमोर आहेत.

वाकडीत भाऊबंदकी

कळंब तालुक्यातील वाकडी (के) येथील प्रभाग एकमधील नामाप्र प्रवर्गातील जागेसाठी दादाराव गोरे व हनुमंत गोेरे हे सख्खे चुलतबंधू; तर प्रभाग एकमधील सर्वसाधारण जागेसाठी प्रमिला कोल्हे व विजयमाला वाघमारे या दोन सख्ख्या चुलत बहिणी एकमेकींविरुद्ध उभ्या आहेत.

तसेच भूम तालुक्यातील माणकेश्वर येथील वाॅर्ड क्र.२ मध्ये मनोज अंधारे आणि विशाल अंधारे हे चुलते-पुतणे तर वाॅर्ड क्र. ४ मध्ये विमल मच्छिंद्र दणाणे व राजश्री प्रकाश दणाणे या जावांमध्ये सामना रंगला आहे.

Web Title: Java-Java, grandfather-grandson, brothers also face color