उन्हाचा कडाका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:28 IST2021-04-05T04:28:34+5:302021-04-05T04:28:34+5:30
नांगरणीची लगबग... भूम : तालुक्यातील बहुतांश गावांतील रब्बी हंगामातील पिकांची काढणी हाेऊन मळणीही उरकत आली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ...

उन्हाचा कडाका वाढला
नांगरणीची लगबग...
भूम : तालुक्यातील बहुतांश गावांतील रब्बी हंगामातील पिकांची काढणी हाेऊन मळणीही उरकत आली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आता शेतीची नांगरणी सुरू केली आहे. इंधनाचे दर वाढल्याने ट्रॅक्टरधारकांनी नांगरणीचे दरही वाढविले आहेत. सध्या एकरी अठराशे ते दाेन हजार रुपये एवढा नांगरणीचा दर आहे.
पाणवठे काेरडेच...
भूम : तालुक्यातील वनक्षेत्रात पशु-पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करण्यात आले आहेत. सध्या उन्हाचा कडाका वाढला असतानाही काही पाणवठ्यांमध्ये अद्याप पाणी टाकलेले नाही. त्यामुळे हिंस्र पशु मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागले आहेत. ही बाब लक्षात घेता पाणवठ्यांत पाणी साेडण्याची गरज आहे.
खवाभट्ट्या पुन्हा थंड...
ईट : काेराेनाचा संसर्ग वाढताच बाहेरराज्यात जाणारा खवा बंद झाला आहे. परिणामी खव्याला उठाव नाही. त्यामुळे अनेक खवाभट्टी चालकांनी आपल्या भट्ट्या बंद केल्या आहेत. याचा फटका आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे. या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातून उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.
डांबरीकरणाची मागणी
ईट : भूम तालुक्यातील पखरूड येथून वडाचामळा वस्तीकडे जाणाऱ्या ५०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. परंतु, उर्वरित रस्त्याचे केवळ खडीकरण झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी वस्तीवरील रहिवाशांतून केली जात आहे.