टंचाईची तीव्रता वाढू लागली

By Admin | Updated: March 31, 2015 00:37 IST2015-03-31T00:14:43+5:302015-03-31T00:37:18+5:30

उस्मानाबाद: वाढत्या उन्हाबरोबरच जिल्ह्याच्या विविध भागात टंचाईची तिव्रताही वाढू लागली आहे. पाणी प्रश्न गंभिर होत असल्याने अनेक गावात चिंतेचे वातावरण असल्याचे चित्र आहे.

The intensity of intensity started to grow | टंचाईची तीव्रता वाढू लागली

टंचाईची तीव्रता वाढू लागली


उस्मानाबाद: वाढत्या उन्हाबरोबरच जिल्ह्याच्या विविध भागात टंचाईची तिव्रताही वाढू लागली आहे. पाणी प्रश्न गंभिर होत असल्याने अनेक गावात चिंतेचे वातावरण असल्याचे चित्र आहे. ढोकी येथील तेरणा प्रकल्पातील मृतसाठा पाहता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने ८ दिवसांतून एकवेळेस पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तेर, ढोकी, येडशी व कसबे तडवळे या गावांना पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. लोहारा शहरालाही टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. काही भागात तीन-चार दिवसाला तर काही भागात दहा ते पंधरा दिवसातून एक वेळा पाणी सोडले जात आहे. त्यातच नादुरुस्त बोअरच्या दुरुस्तीकडे कानाडोळा केला जात असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी सोमवारी सरपंच, उपसरपंचांना घेराव घालून धारेवर धरले.
तेर : तेरणा प्रकल्पातील मृतसाठा पाहता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने ८ दिवसांतून एकवेळेस पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ वाढती उन्हाची तीव्रता आणि प्रकल्पातील अल्पपाणीसाठा पाहता पाणीवितरणाचे नियोजन करण्यासाठी येथील जलशुध्दीकरण केंद्रावर सोमवारी चार गावच्या ग्रामविकास अधिकारी, पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली़ विशेष म्हणजे पाण्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर बैठक असतानाही तेर वगळता ढोकी, येडशी व कसबेतडवळे गावातील पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले़
गतवर्षी अल्पप्रमाणात पाऊस झाल्याने तेरणा मध्यम प्रकल्पात केवळ १४ टक्के पाणीसाठा झाला होता़ मागील तीन-चार दिवसांपासून पाणीपुरवठ्याच्या जॅक व्हिलमध्ये पाण्याचा प्रवाह कमी झाल्यामुळे शुध्दीकरणासाठी उचलले जाणारे पाणी अल्पप्रमाणात येत आहे़ यापूर्वी ८ तास पंपींग करून मिळणारे पाणी आता १८ ते १९ तास पंपींग केल्यानंतर मिळत आहे़ त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई पाहता सोमवारी जीवन प्राधीकरणचे उपविभागीय अभियंता रमेश ढवळे, यांत्रिकी विभागाचे उपअभियंता प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत जलशुध्दीकरण केंद्रावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी चारही गावातील पाणीटंचाईचा आढावा घेतला़ तर उपस्थित पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी येणाऱ्या अडचणी मांडल्या़ यावेळी धरणात असलेले पाणी जॅक व्हिल पर्यंत पोहचण्यासाठी असलेली चार रूंद करण्यासह चारही गावात करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली़ शिवाय तीन दिवसाला पाणीपुरवठा करण्यात येणारा पाणीपुरवठा आठ दिवसाला करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला़ त्यामुळे या चारही गावांना आता पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़ त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरावे, असे आवाहनही यावेळी अधिकाऱ्यांनी केले़ बैठकीस तेरचे ग्रामविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, ढोकीचे एम़डीक़रपे, तडवळा येथील इ़बी़माने यांच्यासह वीज तांत्रिक शिवाजी गिरनाळ, भास्कर माळी, अनंत कोळपे, मधूकर आदटराव, जोतीराम पवार, बालाजी मेटे आदी कर्मचारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते़

लोहारा : गेल्या अनेक दिवसांपासून अधिगृहीत स्त्रोतावर अवलंबून असलेल्या लोहारा शहरात सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यातच बंद पडलेल्या बोअरचीही दुरूस्ती केली जात नसल्याचा आरोप करीत शहरातील वॉर्ड क्र.२ मधील महिलांनी सोमवारी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले. या ठिकाणी सरपंचांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध नोंदविला.त्यानंतर ग्रामपंचायतीत आलेल्या सरपंच, उपसरपंचाना घेराव घालून धारेवर धरले.
लोहारा शहरात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जवळपास संपूर्ण शहराची तहान सध्या अधिगृहीत स्त्रोतांवर भागविली जात आहे. काही भागात तीन-चार दिवसाला तर काही भागात दहा ते पंधरा दिवसातून एक वेळा पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यातच शहरातील वॉर्ड क्र. २ मधील छात्रभारती येथे ग्रामपंचायतीचे असलेले बोअरही नादुरूस्त झाले आहे. त्यामुळे टंचाईत आणखीनच भर पडली आहे. याकडे ग्रामपंचायतीचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत या भागातील महिलांनी सोमवारी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास या महिला ग्रामपंचायत कार्यालयात आल्या. परंतु, तेथे सरपंच किंवा उपसरपंच यापैकी कुणीही हजर नव्हते. त्यामुळे महिलांचा संताप अधिकच वाढला. सरपंचांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध नोंदविण्यात आला. यानंतर दहा मिनिटांत सरपंच निर्मला स्वामी आणि उपसरपंच अभिमान खराडे ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाले. यावेळी महिलांनी त्यांना घेराव घालत पाणी टंचाईबाबत धारेवर धरले. उमाकांत लांडगे, अशोक तिगाडे यांच्या इतर संतप्त ग्रामस्थांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी सरपंच स्वामी, उपसरपंच खराडे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य प्रताप घोडके, विजय कावडे, शिवा स्वामी आदींनी या महिलांची समजूत काढत सदर बोअर त्वरित सुरू करण्याचे आश्वासन दिले.

Web Title: The intensity of intensity started to grow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.