कोरोनानंतरचे साइड इफेक्ट्स वाढले, औषधी काळजीपूर्वक घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:33 IST2021-05-10T04:33:17+5:302021-05-10T04:33:17+5:30
उस्मानाबाद : कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात चांगले आहे. मात्र, बरे झाल्यानंतरही जी तीव्र लक्षणे असलेले रुग्ण होते, ...

कोरोनानंतरचे साइड इफेक्ट्स वाढले, औषधी काळजीपूर्वक घ्या
उस्मानाबाद : कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात चांगले आहे. मात्र, बरे झाल्यानंतरही जी तीव्र लक्षणे असलेले रुग्ण होते, त्यांच्यात बरीच शारीरिक गुंतागुंत निर्माण होऊ लागली आहे. प्रामुख्याने रक्तात गुठळ्या होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कोरोनातून बाहेर पडल्यानंतरही पुढचे काही महिने स्वत:ची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४४ हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ३६ हजारांवर रुग्ण हे या आजारावर मात करून बाहेर पडले आहेत. असे असले तरी त्यांच्यातील शारीरिक गुंतागुंत कमी झालेली नाही. विशेषत: जे रुग्ण तीव्र लक्षणांचे होते, त्यांच्यातील बहुतेकांना अन्य व्याधी सतावू लागल्या आहेत. अशक्तपणा, अंगदुखी, दम लागणे या काही सर्वसाधारण व्याधींसोबतच आता रक्तात गुठळ्या तयार होणे, फायब्रोसिस यासारखे आजारही दिसून येऊन लागले आहेत. यामुळे ज्यांना त्रास जास्त जाणवत असेल, त्यांनी वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
रेमडेसिविरचे साइड इफेक्ट्स...
कोरोनाग्रस्तांसाठी रेमडेसिविर हे जणू रामबाण औषध असल्याप्रमाणे त्याचा अतिरेकी वापर अनेक ठिकाणी होत आहे. मात्र, कोरोनातून बरे झाल्यानंतर अतिरेकी वापराचे साइड इफेक्ट्स जाणवू लागतात. हृदयाची गती सर्वसाधारण ७० ते ८५ दरम्यान असावी लागते. ती काही रुग्णांमध्ये ६० पर्यंत आढळून येत आहे. अशा रुग्णांना हृदयविकाराचा धोका अधिक आहे. शिवाय, रक्त तयार करणा-या बोनमॅरोची कार्यक्षमताही कमी होत जात आहे. त्यामुळे ॲनिमियासारखे आजार तयार होत आहेत. रक्तातील पेशी कमी होण्याचे प्रमाणही अतिरेकी वापरामुळे जास्त आहे.
स्टेरॉइडचे साइड इफेक्ट्स...
कोरोनाबाधितांवर उपचार करताना स्टेरॉइडचाही वापर केला जात आहे. या स्टेरॉइडचा अतिवापरही धोकादायक आहे. मध्यम ते तीव्र लक्षणे असलेले कोरोनाबाधित बरे झाल्यानंतर स्टेरॉइडच्या अतिवापरामुळे त्यांच्यातील हायपरटेन्शन वाढीस लागते. जे रुग्ण मधुमेह सुरू होण्याच्या टप्प्यात असतात, त्यांना मधुमेह होत आहे. फंगल इन्फेक्शन वाढण्याचा धोका आहे. फुफ्फुस फायब्रोस होऊन पुढच्या काही महिन्यांपर्यंत त्याची क्रयशक्ती कमी होते.
काय होतात परिणाम...
मध्यम व तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांमध्ये नंतर वेगवेगळ्या गुंतागुंती तयार होत आहे. साधारणत: अशक्तपणा, अंगदुखी, दम लागणे, अंधारी येणे या काही कॉमन बाबी अशा रुग्णांमध्ये आढळून येत आहेत.
काय घ्यावी काळजी...
कोरोनातून बरे झाल्यानंतर नागरिकांना जे त्रास जाणवत असतील, त्याच्याशी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांकडून वेळीच तपासणी करून घ्यावी व लागलीच उपचार सुरू करावेत. याशिवाय, सध्या फंगल इन्फेक्शन, फायब्रोसिसमुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होत आहे. त्यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता तसेच रक्तदाब, ऑक्सिजन वेळोवेळी तपासत राहावे.
-डॉ. राज गलांडे, उस्मानाबाद
सध्या कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचे निदर्शनास येत आहे. हे प्रमाण पहिल्या लाटेपेक्षा यावेळी जास्त आहे. हे टाळण्यासाठी शरीरातील पाणी कमी होऊ द्यायचे नाही. वारंवार पाणी पीत राहावे. जे कोमॉर्बिड रुग्ण आहेत, त्यांनी असा त्रास जाणवत असल्यास रक्त पातळ होण्याच्या औषधी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्याव्यात.
-डॉ. महेश वडगावकर, उस्मानाबाद