तुळजाभवानीच्या दर्शन पासची वाढविली संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:25 IST2020-12-26T04:25:46+5:302020-12-26T04:25:46+5:30
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : कोरोना संसर्गाचा प्रसार टाळण्यासाठी मंदिरात गर्दी होऊ नये म्हणून तुळजाभवानी संस्थानने दररोज ८ हजार भाविकांनाच दर्शनाची ...

तुळजाभवानीच्या दर्शन पासची वाढविली संख्या
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : कोरोना संसर्गाचा प्रसार टाळण्यासाठी मंदिरात गर्दी होऊ नये म्हणून तुळजाभवानी संस्थानने दररोज ८ हजार भाविकांनाच दर्शनाची सोय केली होती. मात्र, दूरवरुन आलेल्या भाविकांची यामुळे गैरसोय होत असल्याने आणखी ४ हजार दर्शन पासेस वाढविण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. मंदिरे उघडण्याचा निर्णय झाल्यानंतर तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवी मंदिरात संपूर्ण खबरदारी घेणाऱ्या भाविकांनाच दर्शनासाठी सोडण्याचा निर्णय संस्थानने घेतला होता. शिवाय, जास्त गर्दी उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रतिदिन केवळ ८ हजार भाविकांनाच दर्शनासाठी पास देण्यात येत होते. मात्र, हे पासेस पहाटेपासून वितरीत होण्यास सुरुवात होत असल्याने ते लवकरच संपुष्टात येत होते. दुपारी आलेल्या भाविकांनाही पास मिळत नसल्याने दूरवरून आलेल्या भाविकांचा हिरमोड होत होता. दरम्यान, आता आलेल्या सलग सुट्यांचाही विचार करून मंदिर संस्थानने आणखी ४ हजार अतिरिक्त पासेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वीचे ८ हजार दर्शन पासेस हे पहाटे ५ ते दुपारी ४ या कालावधीत उपलब्ध होतील. उर्वरित ४ हजार दर्शन पासेस दुपारी चार ते रात्री ८ या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील ८ हजार पासेस चार वाजेपूर्वीच संपल्यास दुसऱ्या टप्प्यातील पास मिळविण्यासाठी ४ वाजता सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या रांगेची प्रतीक्षा भाविकांना करावी लागेल. शिवाय, मंदिर रात्री ९ वाजता भक्तांच्या दर्शनासाठी बंद करण्यात येणार आहे. हे दर्शन पासेस सकाळच्या सत्रात नवीन प्रशासकीय इमारतीचा तळमजला, घाटशिळ रोडवरील १०८ भक्तनिवास व १२४ भक्त निवासच्या शेजारी उपलब्ध होतील. दुपारच्या सत्रातील दर्शन पासेस हे १०८ भक्तनिवास व १२४ भक्त निवास येथे उपलब्ध होतील. दरम्यान, वाढीव पासेस ही तात्पुरती व्यवस्था असेल व कोरोनाचा संसर्ग वाढीस लागल्यास ते पुन्हा रद्द करण्याचा किंवा अन्य उचित निर्णय घेण्याबाबत विचार होईल, असे व्यवस्थापक तथा तहसीलदार सौदागर तांदळे यांनी सांगितले.