आंब्याच्या बागेतून पावणेचार लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:20 IST2021-07-05T04:20:55+5:302021-07-05T04:20:55+5:30
कळंब : सेवानिवृत्तीनंतर निरामय जीवन जगता यावे यासाठी त्यांनी एका गावात जमीन घेत त्यामध्ये सेंद्रीय पध्दतीने मशागत करून आंब्याची ...

आंब्याच्या बागेतून पावणेचार लाखांचे उत्पन्न
कळंब : सेवानिवृत्तीनंतर निरामय जीवन जगता यावे यासाठी त्यांनी एका गावात जमीन घेत त्यामध्ये सेंद्रीय पध्दतीने मशागत करून आंब्याची बाग जोपासली. मागच्या काही वर्षात त्या बागेने वर्षाला दोनेक लाखाचे उत्पन्न दिले असतानाचा यंदा ही सेंद्रीय बाग पावणेचार लाखाला गेली आहे. फळबाग लागवडीची ही यशोगाथा वयाच्या साठीनंतर साकारली आहे ती डॉ. देवीदास गंभिरे यानी.
कळंब तालुक्यातील ईटकूर येथील प्रा. डॉ. देवीदास बाबूराव गंभिरे यांनी मोठ्या जिद्दीने कमवा व शिका योजनेतून शिक्षण घेत कायम गुणवत्ता राखली. पुढे उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात भूगोल विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिले. या ठिकाणी ३५ वर्षे विभागप्रमुख म्हणून काम केलेल्या डॉ. गंभिरे यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे नाव. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षण मंडळाचे पंचवीस वर्षे सदस्य तर पाच वर्षे भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या गंभिरे यांनी शाहू कॉलेजला पाच वर्षे पदव्युत्तरला मार्गदर्शन केले. विविध शोधनिबंध प्रसिद्ध असलेल्या डॉ. देवीदास गंभिरे यांची दोन्ही मुले एमडी डॉक्टर. एक अमेरिकेत तर दुसरा मुंबईत. एक सून सनदी लेखापाल तर एक डॉक्टर. आपली मुले आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करत असतानाच डॉ. देवीदास गंभिरे यांनी सेवानिवृत्तीनंतर करायचे काय, या प्रश्नाचे उत्तरही स्वतःच शोधले अन् स्वतःला शेतीमातीशी रममाण करून घेतले.
खामसवाडीत जमीन घेत केशर, रत्ना आंब्याची लागवड केली. सेंद्रिय जोपासनेतून त्यांनी मागच्या सात-आठ वर्षात दोनेक लाखांचे दरवर्षी उत्पन्न मिळवले. यातच यंदा उच्चांकी असे पावणेचार लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. वयाच्या साठीनंतरही कार्यशील राहत डॉ. गंभिरे यांनी फळबाग शेतीची निर्माण केलेली यशोगाथा उल्लेखनीय अशी आहे.
चौकट...
सेंद्रिय पध्दतीने जोपासली बाग...
डॉ. देवीदास गंभिरे यांनी आपल्या खामसवाडी येथील जमिनीच्या दोन एकर क्षेत्रात आठ बाय आठ मीटर अंतरावर आंब्याची २००७ मध्ये गावरान रोपे लागवड केली. यानंतर दुसऱ्या वर्षी त्यास कलम केले. खड्ड्यात शेताच्या गोठ्यातील काडी कचरा, शेणखताचा सातत्याने वापर केला. ठिबक सिंचनाचा अवलंब करत केवळ उन्हाळ्यात दोन महिने पाण्याची काळजी घेतली. यातून त्यांच्या शंभर रोपाचे मोठ्या आम्रवृक्षात रूपांतर झाले आहे.
मूठभर खत नाही, लाखोंचे उत्पन्न
डॉ. गंभिरे यांनी आपल्या शेतातील केशर, रत्ना आंब्याची बाग जोपासताना मूठभरही रासायनिक खत वापरले नाही. गांडूळ खत व गाईंच्या भुसकटाचा वापर केला. या प्रयत्नाला पत्नी वैशाली गंभिरे यांचीही मोलाची साथ मिळाली. यामध्ये सोयाबीन, उडीद व मूग अशी आंतरपिकेही घेतली जातात. यातून त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दोन वर्षांपूर्वी या बागेतील काही आंबा परदेशीही गेला होता.
जेथे जाईल तेथे समरस व्हायचं
यासंदर्भात ‘लोकमत’शी संवाद साधताना डॉ. देवीदास गंभिरे यांनी आपण ज्या क्षेत्रात जाऊ, तेथे समरस व्हायला हवे. मी पण सेवेत असताना तेथे समरस झालो. परत सेवानिवृत्तीनंतर गावाकडे, शेतात रममाण होतो. कमी खर्चात, कमी पाण्यात, कमी मेहनतीमध्ये सातत्यपूर्ण चांगले उत्पन्न देणारी आंबा ही एक फळबाग आहे, असेही त्यांनी सांगितले.