ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना, उपक्रम राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:14+5:302021-07-07T04:40:14+5:30
कळंब : ज्येष्ठ नागरिकांसाठी पालिकेने विविध उपक्रम, योजना राबवाव्यात, अशी मागणी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नगराध्यक्ष संजय मुंदडा ...

ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना, उपक्रम राबवा
कळंब : ज्येष्ठ नागरिकांसाठी पालिकेने विविध उपक्रम, योजना राबवाव्यात, अशी मागणी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नगराध्यक्ष संजय मुंदडा यांच्याकडे करण्यात आली.
नगरपरिषदेचे अध्यक्ष म्हणून संजय मुंदडा यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर नवीन संकल्पना मांडली असून, यानुसार शहराच्या विकास प्रक्रियेत नागरिकांना थेट सहभाग घेता येणार आहे. यासाठी नागरिकाकडून थेट विषय मागवून घेऊन, यातून नगरपरिषद सर्वसाधारण सभेची विषयपत्रिका ठरविली जाणार आहे. या उपक्रमाचे कळंब तालुका ज्येष्ठ नागरिक संघाने स्वागत व कौतुक करून मागण्याचे निवेदन दिले. ज्येष्ठ नागरिकांना माहिती व मनोरंजन यासाठी वृत्तपत्राची सोय व्हावी, शक्य झाल्यास एक टीव्ही संच उपलब्ध करून द्यावा, ज्येष्ठ नागरिकांना दूर चालणे शक्य होत नाही. यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागात ज्येष्ठ नागरिकांसाठी नगरपरिषदेने नाव टाकून चार सिमेंट बाकांची व्यवस्था करावी, असे ज्येष्ठ नागरिक संघाचे मराठवाडा कार्यकारणी सदस्य डी.के. कुलकर्णी, तालुका अध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, उपाध्यक्ष अच्युतराव माने, सहसचिव माधवसिंह राजपूत यांनी दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे. ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने या स्वरूपाची व्यवस्था ग्रामपंचायतीनेही करावी, यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.