वाळलेल्या तणसाला आकार देत साकारली छत्रपती शिवरायांची प्रतिमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:33 IST2021-04-01T04:33:11+5:302021-04-01T04:33:11+5:30
शिराढोण येथील श्रीमंतयोगी युवा मंचने शिवजयंतीच्या निमित्ताने राबवलेल्या उपक्रमात पांचाळ यांनी ‘ग्रास व क्रॉप’ या नव्या पेटींग प्रकाराचा समन्वय ...

वाळलेल्या तणसाला आकार देत साकारली छत्रपती शिवरायांची प्रतिमा
शिराढोण येथील श्रीमंतयोगी युवा मंचने शिवजयंतीच्या निमित्ताने राबवलेल्या उपक्रमात पांचाळ यांनी ‘ग्रास व क्रॉप’ या नव्या पेटींग प्रकाराचा समन्वय साधत ही विक्रमी कलाकृती वास्तवात आणली आहे.
कला, संगीत अशा विविध क्षेत्रातील विक्रमात यापूर्वी केवळ शहरी चोहऱ्यांची मक्तेदारी असायची. मात्र, अलिकडे अशा कलागुणांत ग्रामीण भागातील अवलिया मंडळीचे ‘रेकॉर्ड’चाही चांगलाच बोलबाला दिसून येत आहे.
शिराढोण येथील कृष्णा पांचाळ या २३ वर्षीय तरूणानेही बुधवारी अशीच विक्रमी कलाकृती साकारली आहे. निमित्त होते छत्रपती शिवरायांच्या जयंतीचे अन् यानिमित्ताने गावातील श्रीमंतयोगी युवा मंचने आयोजीत केलेल्या उपक्रमाचे.
श्रीमंतयोगी युवा मंचच्या कुलदीप पाटील, महेश माकोडे, ऋषीकेश कासार, दत्ता माकोडे, अविनाश माकोडे, अजय म्हेत्रे, समाधान माकोडे, सुजीत सुरवसे आंदीनी छत्रपती शिवराय यांची भव्य प्रतिमा साकारत शिवजयंती साजरी करण्याचा संकल्प केला होता.
ही कल्पना सवंगडी असलेल्या कृष्णा वसंत पांचाळ यांनी वास्तवात आणण्यास सुरूवात केली. यानुसार सलग चार दिवस मेहनत घेत कृष्णा यांनी लातूर रोडवरील एका शेतात तब्बल ४० हजार स्वेअर फूट आकाराच्या शेतात काढलेल्या गव्हाच्या शेतात छत्रपती शिवराय यांची प्रतिमा साकारली आहे.
ड्रोन कॅमेऱ्यात ही विक्रमी कला नयनरम्य अशी दिसत आहे. यासाठी कृष्णा यास श्रीमंतयोगी युवा मंचच्या सदस्यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. ही विक्रमी कला सादर करणाऱ्या कृष्णा पांचाळ यांचा युवा मंचचे अध्यक्ष कुलदीप पाटील यांनी सत्कार केला. या कलाकृतीचे मोठे कौतूक होत आहे.
चौकट...
ग्रास पेटींग आणि क्रॉप आर्टचा समन्वय
कृष्णा यांनी निवडलेल्या जमिनीवरील गव्हाची नुकतीच काढणी झाली होती. याठिकाणी कापणीनंतर वावरात गव्हाचे खुरटे काड उभे होते. याला तणस असेही संबोधतात. साधारणतः एक एकर आकाराच्या या पिकात ३१० बाय १०५ फूट आकारात महाराजांच्या प्रतिमेची ग्राफिक्सनुसार आखणी केली. यानंतर डिझेल स्टोच्या झळांचा वापर करत गव्हाचे तणस जाळण्यात आले. आकारास आवश्यक तेवढा भाग जाळायचा अन् उर्वरित भाग लागलीच पाणी टाकत विझवायचा, अशी कसरतीची चार दिवस कृती करत कृष्णा पांचाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची विक्रमी प्रतिमा साकार केली आहे.
छंदातून बहरली कला
कृष्णा पांचाळ यांनी ना चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले आहे ना एखादा ‘आर्ट’ डिप्लोमा. अंगी काय फक्त चित्रकलेची आवड. या वेडातूनच त्याची कला बहरत गेली. यातून प्रोफेशनल कलरिंग व पेटींगची कामे करत राहिला. यात मग अधूनमधून आपल्या कल्पकतेने विविध प्रकाराच्या चित्रकृती,चित्रप्रकार साकारण्याचा त्याचा छंद आहे. शिराढोण येथे गव्हाच्या काढनीनंतर वावरात उभ्या असलेल्या वाळलेल्या तणसाला आकार देत छत्रपती शिवाजी महाराज साकारले आहेत. यासाठी ग्रास पेंटींग व क्रॉप आर्ट यांचा समन्वय साधला आहे.