उस्मानाबाद : बँकाचे उंबरठे झिझवूनही पीक कर्ज मिळेनासे झाले, शासनाच्या शेतीसंदर्भात किती योजना आहेत. त्याची माहिती मिळेल का? असे विविध प्रश्नाबाबत ९१६ कॉल शिवार हेल्पलाईनकडे मागील सात महिन्यात धडकले आहेत. तणावाची मानसिकता, आत्महत्येच्या विचारातून ग्रासलेल्या या शेतकऱ्यांना नाजूक अवस्थेतून मानसिकरीत्या बाहेर काढून जाण्याची नवी उमेद शिवार हेल्पलाइनच्या मानसोपचार तज्ज्ञांनी दिली. काहींच्या कर्जप्रकरणासाठी थेट बँकेसोबत संपर्क साधून मार्गदर्शनही केले आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्ह्यात जून महिन्यापासून शिवार हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नव्हते. त्यामुळे जून ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान बियाणे उगवले नाही याबाबत २३ जणांनी फोन केले होते. बदलत्या वातावरणामुळे पिकांनाही फटका बसत असतो, त्यामुळे हवामान अंदाजाबाबतही १४ शेतकऱ्यांचे कॉल धडकले होते. याशिवाय पीक विमा मिळेना २९५ शेतकऱ्यांनी फोन केला आहे. कृषी विभागाकडून शेतीसंदर्भात विविध योजना राबविल्या जात असतात. मात्र, या योजनांची म्हणावी तशी जनजजागृती केली जात नाही. त्यामुळे शेतीच्या योजनेसंदर्भात २८२ कॉल आले आहेत. याशिवाय, कर्जमाफीबाबत २९ व्यक्तींनी संपर्क साधला होता. शेतरस्ताच्या वादासंदर्भात ९१ जणांनी फोन केले. पी.एम. किसान १३, पीक कर्ज ४४, हेल्पलाइनबद्दल माहिती ३०, कर्जमाफी २९, शासकीय अनुदान अडचण १०, नुकसान भरपाई ९, बँक संबंधी अडचण ९, शैक्षणिक मदतविषयी ६, रेशनसंबंधी ६, डीपीसंबंधी अडचण ६, कौटुंबिक वाद ५, रानडुकरांचा त्रास ४, बाजारभाव व मार्केट ४, ऊस बिल ३, होम लोन ३, खात्यातून पैसे गेले ३, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना ३, रोजगार पाहिजे ३, आरोग्य शिबिर माहिती २, सावकारकडून फसवणूक झाल्याचे दोन फोन धडकले होते. या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. प्रश्नाबाबत मार्ग काढण्याचे मार्गदर्शन करून प्रश्नाचे निरसन केले. काही प्रकरणात फोनवरून संबंधितांना संपर्क साधून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्नही केला.
सर्वाधिक ३९२ कॉल उस्मानाबाद तालुक्यातून
शिवार हेल्पलाइनकडे मागील सात महिन्यांच्या कालावधीत उस्मानाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांकडून ३९२ कॉल आले आहेत. त्याखालोखाल तुळजापूर तालुक्यातून १२९, कळंब १०९, उमरगा ९६, भूम ५६, लोहारा ४२, वाशी २४, परंडा तालुक्यातून १५ कॉल करण्यात आले होते.
३० ते ४० वयोगटातून सर्वाधिक फोन
शिवार हेल्पलाइनकडे विविध प्रश्नाबाबत फोन ३० ते ४० वयोगटातील येत आहेत. या वयोगटातील ३२१ जणांनी सात महिन्यात फोन केले आहेत. २० ते ३० वयोगटातील व्यक्तींचे ३१० फोन, ४० ते ५० वयोगटातील १७० फोन आले होते. ९६ फोन ५० वयाच्या पुढील व्यक्तीने केले आहेत. तर १५ ते १९ वयोगटातील व्यक्तींनी १९ फोन केले होते.
कोट...
शिवार हेल्पलाइनला संपर्क केेलेल्या शेतकऱ्यांपैकी मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आत्महत्येचे विचार, तणावग्रस्त, त्रस्त शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. आत्महत्याच्या विचारात असलेल्या ७० जणांनी फोन केले होते. यात तीव्र स्वरूपाचे २, मध्यम स्वरूपाचे ६३, सौम्य स्वरूपाचे ५ जणांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना या विचारातून मानसिकरित्या बाहेर काढले आहे.
अशोककुमार कदम, जिल्हा समन्वयक, शिवार हेल्पलाइन