ऑक्सिजन बेडसह आयसीयू कक्षही फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:30 IST2021-04-14T04:30:06+5:302021-04-14T04:30:06+5:30

(फोटो : अजीत चंदनशिवे १३) तुळजापूर : तुळजापूर शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, या उपचारात महत्त्वपूर्ण ...

The ICU room is also full with oxygen beds | ऑक्सिजन बेडसह आयसीयू कक्षही फुल्ल

ऑक्सिजन बेडसह आयसीयू कक्षही फुल्ल

(फोटो : अजीत चंदनशिवे १३)

तुळजापूर : तुळजापूर शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, या उपचारात महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या ऑक्सिजन बेडची कमतरता भासण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. सध्या ऑक्सिजनचे १०० बेड असलेले उपजिल्हा रुग्णालय फुल्ल झाले असून, आयसीयू कक्षातही बेड शिल्लक नाही. त्यातच उस्मानाबाद, लोहारा आदी ठिकाणचे रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होत असल्याने प्रशासनासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत फक्त रुग्णच वाढत नसून, उपचाराच्या सोयी-सुविधांचीही कमतरतादेखील भासत आहे. त्यात १०० ऑक्सिजन बेडची सुविधा असलेले उपजिल्हा रुग्णालयही फुल्ल झाली आहेत तसेच या रुग्णालयात आयसीयू विभागात वीस बेड असून, तेही फुल्ल आहेत. शिवाय, लसीकरणाचा साठा संपल्यामुळे या मोहिमेलादेखील ब्रेक लागला आहे. त्यामुळे परिस्थिती एकूणच चिंताजनक बनली आहे.

तुळजापुरात सध्या ३५० रुग्ण पॉझिटिव्ह असून, उपजिल्हा रुग्णालय, १२४ कोविड केअर सेंटर, कुतवळ हॉस्पिटल या तीन सेंटरमध्ये २०० रुग्ण दाखल आहेत. १५० रुग्णांना होमआयसोलेशन करून उपचार सुरू आहेत. सध्या नॉन ऑक्सिजनचे १२४ कोविड केअर सेंटर व कुतवळ हॉस्पिटलमध्ये १८९ बेड शिल्लक आहेत. वास्तविक १२४ कोविड सेंटर हे ३०० बेडचे आहे; परंतु, येथे ऑक्सिजनचा एकही बेड नसल्याने सध्याच्या स्थितीत १२४ कोविड सेंटरमधील रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासल्यास त्याला उपजिल्हा रुग्णालयात हलवून उपचार करण्याची वेळ आरोग्य यंत्रणेवर येत आहे.

कोट......

शहर व तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजनचे बेड कमी पडत आहेत. त्या अनुषंगाने आणखी ऑक्सिजन बेडचे आवश्‍यकता पडू शकते. त्याकरीता १२४ कोविड केअर सेंटर येथे मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आलेले ऑक्सिजन सेंटर लाईनचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

- आनंद कंदले, सदस्य रुग्णकल्याण समिती

दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. ऑक्सिजनचे बेड फुल्ल आहेत. १२४ कोविड केअर सेंटरमध्ये नॉन ऑक्सिजनचे बेड शिल्लक आहेत. १२४ कोविड केअर सेंटरला मंदिर संस्थानकडून १०० बेडच्या ऑक्सिजनची लाईन टाकली आहे परंतु, तीही रखडली आहे. एक-दोन दिवसांत त्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर काही अडचण येणार नाही. याशिवाय १०८ भक्तनिवास कोविड केअर सेंटरदेखील पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी कुठलेही दुखणे अंगावर न काढता तातडीने उपचार घ्यावेत.

- डॉ. चंचला बोडके, वैद्यकीय अधीक्षक

Web Title: The ICU room is also full with oxygen beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.