कोरोना लसीकरणानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST2021-06-22T04:22:27+5:302021-06-22T04:22:27+5:30

उस्मानाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. शहरी तसेच ग्रामीण स्तरावर मोठ्या प्रमाणात लसीकरण ...

Hurry to go home after corona vaccination can be expensive! | कोरोना लसीकरणानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात !

कोरोना लसीकरणानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात !

उस्मानाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. शहरी तसेच ग्रामीण स्तरावर मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. लस घेतल्यानंतर रुग्णांना अर्धा तास निगराणीखाली राहणे आवश्यक असते. मात्र, काही नागरिक लस घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई करीत असतात. लस घेतल्यानंतर चक्कर येणे, रिॲक्शन होऊ शकते. त्यामुळे घरी जाण्याची घाई महागात पडू शकते.

गतवर्षी मार्च महिन्यापासून देशभरात कोरोनाने हाहाकार घातला होता. आजार नवीन असल्याने प्रारंभी यावर प्रभावी औषध, तसेच लसदेखील उपलब्ध नव्हती. उपलब्ध साधनसामग्रीवरच डाॅक्टर्स व आरोग्य विभागातील कर्मचारी कोरोनाशी लढा देत होते. शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमाने एक वर्षाच्या आता कोरोना प्रतिबंधात्मक लस तयारही झाली. त्यामुळे या आजाराच्या विरोधात लढण्यास काहीअंशी दिलासा मिळाला आहे. १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. मागील सहा महिन्यांत ग्रामीण, तसेच शहरी भागातही लसीकरण मोहिमेस नागरिकांडून प्रतिसाद मिळत आहे. लस घेतल्यानंतर नागरिकांना चक्कर येण्याची शक्यता असते. तसेच काहींना रिॲक्शन किंवा ॲलर्जीचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे लस घेतल्यानंतर नागरिकांना अर्धा तास केंद्रावर बसणे अनिवार्य करण्यात आले आहे. अनेकजण तातडीने केंद्राबाहेर पडतात; पण असे करणे धोक्याचे ठरू शकते असे डॉक्टरांनी सांगितले.

आतापर्यंत झालेले लसीकरण

एकूण लसीकरण - ३०७८३४

पहिला डोस - २५१७७८

दुसरा डोस - ५६०५६

एकूण लसीकरण केंद्र - २४९

३०ते ४० वयोगटांसाठी केंद्र - १०

लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी?

लस घेतल्यानंतर चक्कर येण्याची शक्यता असते. तसेच काहीजणांना ॲलर्जीचा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे लस घेतल्यानंतर अर्धा तास निगराणीखाली ठेवले जाते. या ठिकाणी एक डॉक्टर, परिचारिका व अन्य तीन कर्मचाऱ्यांचा ताफा सज्ज असतो.

त्यामुळे रुग्णांवर तत्काळ उपचार करता येतात.

लस हेच औषध

कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस प्रभावी भरत असल्याने. नागरिक लस घेण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सध्या लस हेच औषध ठरत आहे.

कोट...

लस घेतल्यानंतर केंद्रावर अर्धा तास लस घेतलेल्या व्यक्तीस निगराणीखाली राहणे गरजेचे असते. लस घेतल्यानंतर तत्काळ बाहेर पडल्यानंतर चक्कर येणे, ॲलर्जीचा त्रास जाणवू लागण्याची शक्यता असते. अद्याप जिल्ह्यात असे प्रकार घडले नाहीत. नागरिकांनी लसीकरणानंतर अर्धा तास केंद्रावरच थांबावे.

डॉ. कुलदीप मिटकरी, लसीकरण अधिकारी

Web Title: Hurry to go home after corona vaccination can be expensive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.