हॉटेल बंदीने महिलांची भाजी भाकरी थांबली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:33 IST2021-04-07T04:33:38+5:302021-04-07T04:33:38+5:30
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव हे गाव औरंगाबाद-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर आहे. या रस्त्यावर पारगाव नजीक सहा सात ...

हॉटेल बंदीने महिलांची भाजी भाकरी थांबली !
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव हे गाव औरंगाबाद-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर आहे. या रस्त्यावर पारगाव नजीक सहा सात हॉटेल असून, येथे काम करून अनेकजण आपले उदरनिर्वाह भागवितात. परंतु, आता हॉटेल व्यवसायावर निर्बंध आल्यामुळे येथे काम करणाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
देशभरात कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असून, या अनुषंगाने राज्य शासनाने अनेक प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील मंगळवारपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय, हॉटेल चालकांना केवळ पार्सल सेवा पुरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे इतर व्यावसायांप्रमाणेच हॉटेल व्यवसाय देखील अडचणीत सापडले आहेत. पारगाव येथील हॉटेल्स महामार्गावर असल्यामुळे सतत ग्राहकांची वर्दळ असते. येथे इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच महिला देखील भाकळी, पोळी बनविण्यासाठी कामाला येतात. त्यांना दिवसाकाठी तीनशे ते साडेतीनशे रुपये हजेरी मिळते. परंतु, प्रशासनाच्या निर्णयामुळे हॉटेल व्यवसाय निम्यावर आला असून, हा व्यवसाय परवडत नसल्याने अनेकानी कामगार कपात सुरू केली आहे. यामुळे येथील कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
चाैकट......
वर्ष कसे काढले आमचे आम्हाला ठाऊक
मागील वर्षी कोरोना संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. यामुळे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या या कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. या कालावधीत प्रत्येकाने आपापल्या परीने इतर पर्याय शोधले होते.
पारगाव येथील शालन बिरू पवार या महिलेने गेल्या लॉकडाऊन कालावधीत हॉटेल व्यवसाय बंद झाल्यानंतर कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी फुटाणे तयार करून विकले. तसेच प्रसंगी दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी देखील केली.
प्रतिक्रिया
पतीचे अकाली निधन झाल्याने व मूल लहान असल्याने कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरच आली. त्यामुळे मी हॉटेलमध्ये भाकरी-पोळी बनवून कुटुंबाचा उदर निर्वाह भागविते. मागील वीस वर्षांपासून मी हे काम करीत आहे. गेल्या लॉक डाऊन काळात हॉटेल बंद झाल्याने शेतात काम केले. त्याच बरोबर महिलांचे उन्हाळी काम करून देणे, हरभरे घेऊन फुटाणे तयार करून दिले. आता पुन्हा तीच परिस्थिती उद्भवल्याने पुन्हा नवा पर्याय शोधावा लागणार आहे.
- शालन पवार, पारगाव
भाजी भाकरी बनवण्यासाठी मी मागील पाच महिन्यापासून कुटुंबासह येथे आले. गावाकडे शेती आहे. मात्र, माळरान असल्याने पिकत नाही. परंतु, आता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आले असून, हॉटेल व्यवसायावर देखील बंधने घालण्यात आली आहेत. येथील काम बंद झाल्यास पुन्हा गावाकडे जाऊन मिळेल ती मोलमजुरीच करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही.
- दीपाली साखरे, रा. शिराळा, जि. लातूर
सरकारने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पार्सल सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांची संख्या निम्म्याने कमी झाली आहे. अशा स्थितीत हॉटेल मॅनेजमेंट करताना आर्थिक स्थिती गणित बिघडत आहे. त्यामुळे हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी २५ कर्मचारी असून, उद्यापासून हॉटेल बंद होत असल्याने या सर्वांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे शासनाने अशा कामगारांसाठी पर्यायी उपाय योजना करणे गरजेचे आहे.
- दादा तांबे, व्यवस्थापक