शैक्षणिक वाण
(फोटो : नूर शेख २४)
कसबे तडवळे : येथील जि. प. केंद्रीय शाळेतील शिक्षिका भावना चौधरी यांनी पाल्याची शैक्षणिक दैनंदिनी लिहिण्यासाठी माता पालकांना वही आणि मुलांना बिस्किट पुडा देऊन संक्रांतीचा सण साजरा केला. याबद्दल मुख्याध्यापक अजय जानराव, शालेय समिती अध्यक्ष मंगेश पाटील आदींनी त्यांचे कौतुक केले.
उपोषण मागे
तुळजापूर : येथील न. प. सफाई कामगारांनी विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू केले होते. दरम्यान, नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी किशोर साठे, विशाल रोचकरी यांच्यासह उपोषणार्थी उपस्थित होते.
दंडाची शिक्षा
लोहारा : सार्वजनिक ठिकाणी मानवी जीवितास धोका होईल, अशी अग्निविषयक निष्काळजीपणाची कृती केल्याप्रकरणी बलभीम विरुदे व अलिशेख रसूल बागवान यांच्या विरुद्ध येथील ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. न्यायालयाने त्यांना प्रत्येकी दोनशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
एकाविरुद्ध गुन्हा
उस्मानाबाद : बहिणीच्या मैत्रिणीचा वेळोवेळी पाठलाग विनयभंग केल्याप्रकरणी जिल्ह्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर तरुणाने अश्लील शिवीगाळ करीत समाजमाध्यमावर छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी दिल्याचेही पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
‘स्वयंशिक्षण’चा महिला मेळावा
परंडा : तालुक्यातील अनाळा येथे स्वयंम शिक्षण प्रयोग यांच्या वतीने महिला मेळावा व हळदी -कुंकू कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी स्वयंम शिक्षण प्रयोगच्या संचालिका नसीम शेख यांनी महिलांना शेळीपालन व शासनाच्या विविध योजनेची माहिती दिली. कोमल कटकटे व राणी शेजाळ यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमास आशा स्वयंसेविका अनिता क्षीरसागर, इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रियंका क्षीरसागर, उमेदच्या समूह प्रेरिका नौशाद शेख, रेणुका सुर्वे, कृषी सखी राणी रेवडे, नसरीन शेख, रेखा सरवदे, सविता बल्लाळ, नूतन ग्रा.पं. सदस्या अंबिका क्षीरसागर, स्वाती चव्हाण, शबनाज शेख, आसिफा शेख, वनिता क्षीरसागर, अर्चना क्षीरसागर, साधना चव्हाण, गीताबाई गोडसे, उषा क्षीरसागर आदी उपस्थित होते.
मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
तेर : तुळजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पदाचा गैरवापर केल्याचा तसेच जातीय भावना भडकवल्याचा आरोप करीत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने ढोकी पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावर जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी कांबळे, अजय कांबळे, महादेव कांबळे, जय कांबळे, राहुल गायकवाड, किशोर पौळ, सचिन कसबे, विलास तौर, अमोल कसबे, आदेश कांबळे, किरण कांबळे, नारायण साळुंखे, अतिश रसाळ, संतोष शिंदे, लाला शिंदे, रमाकांत मोरे, गोपाळ शिंदे, शिवा कांबळे, बापू माने आदींच्या सह्या आहेत.
पंचायत समितीत सहविचार सभा
भूम :येथील पंचायत समितीत सर्व माध्यमाच्या शाळेतील मुख्याध्यापकांची सहविचार सभा गटशिक्षणाधिकारी सुनील गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होत असून, या अनुषंगाने यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ‘सुंदर माझी शाळा’ या उपक्रमात सर्वांनी पुढाकार घेऊन शाळा सुंदर करावी, असे आवाहनही गटशिक्षण अधिकारी गायकवाड यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक तात्या कांबळे, केंद्रप्रमूख उगलमुगले, साधन व्यक्ती आमगे, कुलकर्णी तसेच केंद्रातील मुख्याध्यापक उपस्थित होते.
संस्कार भारतीचा गीतरामायण कार्यक्रम
उस्मानाबाद : श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अभियानासाठी संस्कारभारतीच्या वतीने येथील बँक कॉलनीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गीत रामायण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रसन्न कोंडो यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. त्यांना अण्णा वडगावकर यांची तबल्यावर, अशोकराव कुलकर्णी यांची हार्मोनियमवर तर मीरा वडगावकर यांनी टाळाची साथ दिली. याप्रसंगी अभियान प्रमुख स्वयंसेवक महेश वडगावकर, सुधीर कुलकर्णी, अनिल ढगे, श्यामसुंदर भत्साळी, शेषनाथ वाघ, शरद वडगावकर, सुरेश वाघमारे, प्रभाकर चोराखळीकर, सुधीर पवार, अक्षय भन्साळी, सत्यहरी वाघ हे आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विलास सांजेकर, श्रीराम पाठक, मनोज बडवे, संदीप इंगळे, उदय देशमुख, प्रशांत चौधरी, अजय सूर्यवंशी, स्वप्नील पवार, बंडू भोसले यांचे योगदान लाभले.
विविध प्रकरणांत दंडाची शिक्षा
उस्मानाबाद : विविध प्रकरणांत न्यायालयाने आरोपींना दंडाची शिक्षा सुनावली. ढोकी पोलीस ठाण्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील अविनाश वीर व प्रतीक विकास जोगदंड यांना भादंसं कलम २८५ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवून प्रत्येकी २०० रुपये दंड ठोठावण्यात आला. तसेच उमरगा ठाण्यांतर्गत जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात अविनाश बाबू चव्हाण व संजय रतन चव्हाण यांनाही प्रत्येकी तीनशे रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. याच पोलीस ठाण्यांतर्गत दाखल गुन्ह्यात शिवमूर्ती एकनाथ गुंगे यास तीनशे रुपये दंड ठोठावण्यात आला.
असभ्य वर्तन पडले महागात
उमरगा : असभ्य वर्तन केल्याप्रकरणी उमरगा न्यायालयाने तिघांना प्रत्येकी १ हजार दोनशे रुपये दंड ठोठावला. उमरगा येथील आकाश रोहिदास मोरे, सागर कुंडलिक माने व आकाश बाळू जगताप या तिघांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने त्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०/११७ च्या उल्लंघनाबद्दल दोषी ठरवून हा दंड ठोठावला.
‘कोम्बिंग ऑपरेशन’मध्ये ‘वॉन्टेड’ झाला जेरबंद
उस्मानाबाद : येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक २३ जानेवारी रोजी आरोपींच्या शोधार्थ कोम्बिंग ऑपरेशन करीत होते. यावेळी आनंद नगर पोलीस ठाण्यांतर्गत दाखल चोरीच्या गुन्ह्यातील ‘वॉन्टेड’ बालाजी विनायक काळे ऊर्फ सचिन (वय २८, रा. आंदोरा, ता. कळंब) यास पथकाने आंदोरा येथून ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्याला आनंद नगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
बनावट दस्तऐवज बनवून फसवणूक
तुळजापूर :तालुक्यातील पिंपळा (खु) येथील हरिदास धनाजी कदम, झुंबर कदम, धनाजी कदम, मनोहर कदम, महादेव कदम, राम कदम, संभाजी कदम व गणपत कदम आणि या सर्वांचा भाऊ ज्ञानदेव कदम यांच्यात शेतजमीन वाटणी प्रकरणी दिवाणी न्यायालयात दावा सुरू आहे. असे असतानाही वरील आठ व्यक्तींनी संगनमत करून २३ ऑक्टोबर रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट दस्तावेज बनवून फसवणूक केल्याची तक्रार ज्ञानदेव कदम यांनी न्यायालयात दिली. यावरुन तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाडूंचे वाटप
तुळजापूर : येथे क्रांती चौकात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तुळजापूर शिवसेना वतीने गोरगरिबांना लाडूचे वाटप करण्यात आले. यावेळी सुधीर कदम, श्याम पवार, प्रतीक रोचकरी, लखन परमेश्वर, शामलताई वडणे, शोभाताई सावंत आदी शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.