बालविवाह थांबवून तिच्या शिक्षणाचा मार्ग केला सुकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:25 IST2021-01-13T05:25:50+5:302021-01-13T05:25:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भूम : मुलीची अधिकारी होण्याची इच्छा असतानाही बारावीनंतरच तिचा विवाह लावून देण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पालकांचे मतपरिवर्तन ...

बालविवाह थांबवून तिच्या शिक्षणाचा मार्ग केला सुकर
लोकमत न्यूज नेटवर्क
भूम : मुलीची अधिकारी होण्याची इच्छा असतानाही बारावीनंतरच तिचा विवाह लावून देण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पालकांचे मतपरिवर्तन करत हा बालविवाह रोखण्यात मुख्याध्यापक आणि पोलीस प्रशासनाला यश आले आहे. यावेळी या मुलीच्या चेहऱ्यावरील आनंदही ओसंडून वाहत होता.
आई पूर्णत: अंध, वडिलांचे छत्र लहानपणीच हरवलेले. अशा परिस्थितीतही दिव्याखाली अभ्यास करून सोनाली वाघमारे हिने २०१८-१९ मध्ये भूमच्या जिल्हा परिषद हायस्कूलमधून दहावीच्या परीक्षेत तृतीय क्रमांक पटकावला. दरम्यान, शिक्षण घेत असतानाच आठवीमध्ये पालकांनी तिचा विवाह जमवला होता. मात्र, शिक्षकांच्या पुढाकाराने व तिच्या शिक्षणाच्या जिद्दीमुळे तो मोडला होता. दरम्यान, यावर्षी १२ विज्ञान शाखेत शिक्षण घेत असताना पुन्हा तिच्या विवाहाची चर्चा आणि तयारी सुरू झाली होती. सोनालीला विवाहापेक्षा शिक्षण घेऊन अधिकारी व्हायचं आहे. त्यामुळे विवाहाची चर्चा ऐकून ती बैचेन झाली. याबाबत तिने मुख्याधापक तात्या कांबळे यांना ६ जानेवारी रोजी फोन करून माहिती दिली. यानंतर कांबळे यांनी सर्व हकीकत भूमचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांना सांगितली. मुख्याध्यापक कांबळे व सहायक पोलीस निरीक्षक साळवे यांनी ७ जानेवारीला सोनालीचे वरूड हे गाव गाठून तिच्या आईची भेट घेतली.
यावेळी त्यांनी आईला स्त्री शिक्षणाचे महत्त्व सांगून त्यांचे मतपरिवर्तन केले. तसेच तत्काळ रोख मदत करतानाच पुढे अधिकारी होईपर्यंतच्या सोनालीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च करण्याची हमीदेखील दिली. मुलीची जिद्द पाहून आईनेही माघार घेत विवाहाची चर्चा थांबवली. आपला विवाह टळल्याचा आणि शिक्षणाचा मार्ग सुकर झाल्याचा सोनालीच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद अवर्णनीय होता. कुठलेही संकट आले तरी न डगमगता त्याचा सामना करून आपण आपले स्वप्न साकार करू, असा विश्वास सोनालीने यावेळी व्यक्त केला.