भुकेल्या नातेवाईकांभोवती धरली त्यांनी ओंजळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:33 IST2021-05-10T04:33:08+5:302021-05-10T04:33:08+5:30
उस्मानाबाद : येथील जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची निर्बंधामुळे मोठी परवड होत आहे. अनेकदा उपाशी राहण्याचे प्रसंग त्यांच्यावर ...

भुकेल्या नातेवाईकांभोवती धरली त्यांनी ओंजळ
उस्मानाबाद : येथील जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची निर्बंधामुळे मोठी परवड होत आहे. अनेकदा उपाशी राहण्याचे प्रसंग त्यांच्यावर येत आहेत. ही बाब लक्षात येताच उस्मानाबादेतील काही तरुणाई त्यांच्या मदतीला सरसावली. महिनाभर दररोज १०० डबे अशा गरजू नातेवाईकांना पुरविण्याचा विडा उचलून या मोहिमेला सुरुवातही केली आहे.
सध्या कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
हजारो कुटुंबावर कठीण परिस्थिती उद्भवली आहे. जिल्हा रुग्णालयात उपचाराच्या सर्वाधिक सुविधा असल्याने दूर अंतरावरील खेड्यापाड्यांतून लोक येथे येत आहेत. रुग्णासोबत एखाद-दुसरा नातेवाईकही येथे असतोच. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या कठोर निर्बंधामुळे बाहेरही काही खाण्यास उपलब्ध होत नाही. शिवभोजनचा एकमेव आधार उरला आहे. मात्र, बाहेरून येणार्या नातेवाईकांना ते कुठे मिळते, याचाही पत्ता नसतो. परिणामी, अनेकदा त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ येत आहे.
ही बाब लक्षात आल्यानंतर उस्मानाबादेतील वेदारंभ ग्रुपचे अध्यक्ष डॉ. ऋतुराज कदम पाटील, डॉ. अंकिता काळे, जागृती ग्रुप व होप फाैंडेशनच्या मनिषा वाघमारे यांनी पुढाकार घेतला. संपूर्ण महिनाभर दररोज रुग्णांच्या नातेवाईकांना एकवेळचे जेवण मोफत पुरविण्याचा निर्धार केला आणि लागलीच हा उपक्रम राबविण्यास त्यांनी मित्रमंडळीच्या सहकार्यातून सुरुही केला.
वाढत चालले बळ...
या समाजिक भाव जपणाऱ्या तरुणांनी सुरू केलेल्या उपक्रमास त्यांच्या संपर्कातील तरुण स्वेच्छेने मदत करत आहेत. त्यांच्यातील कामाप्रती असलेली तळमळ पाहून आता आणखीही काही संस्था, व्यक्ती, पक्षाचे पदाधिकारी पुढे येऊन त्यांच्या या कार्याला बळ देत आहेत.
कोट...
उस्मानाबाद जिल्हा सरकारी रुग्णालयाबाहेर नातेवाईकांना आपुलकीने रुग्णाच्या तब्यतेची चौकशी करून त्यांना आम्ही डबा देतो. या कठीण काळात सामाजिक बांधीलकी म्हणून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. प्रसंग खडतर असला तरी कोणी उपाशी राहू नये, अशी यामागची भूमिका आहे.
-डॉ. ऋतुराज कदम पाटील.