तो गोळीबार जेवणाच्या वादातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:59 IST2021-02-06T04:59:47+5:302021-02-06T04:59:47+5:30
उस्मानाबाद : तुळजापूर-लातूर मार्गावरील भंडारी येथील एका हॉटेलचालकावर बुधवारी काही तरुणांनी गोळीबार केला होता. मद्यधुंद तरुणांनी जेवण वेळेवर मिळत ...

तो गोळीबार जेवणाच्या वादातून
उस्मानाबाद : तुळजापूर-लातूर मार्गावरील भंडारी येथील एका हॉटेलचालकावर बुधवारी काही तरुणांनी गोळीबार केला होता. मद्यधुंद तरुणांनी जेवण वेळेवर मिळत नसल्याने हुज्जत घालून हा गोळीबार केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील भंडारी शिवारात बाळासाहेब मोरे यांच्या हॉटेलवर चार तरुण बुधवारी दुपारी जेवणासाठी गेले होते. त्यांनी मद्यपान केल्यानंतर जेवणाची ऑर्डर दिली. मात्र, थोड्याच वेळात सर्व्हिस वेळेवर मिळत नसल्याच्या कारणावरून या तरुणांनी वेटरसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. गोंधळ वाढल्याने हॉटेलचालक बाळासाहेब मोरे हे त्या तरुणांना समजावत होते तेव्हा यातील एकाने त्याच्याकडील बंदूक काढून एक राऊंड हवेत झाडली तर दुसरा समोरून मोरे यांच्यावर झाडले. या घटनेत बाळासाहेब मोरे जखमी झाले आहेत. दरम्यान, चारपैकी तिघेजण कारमधून पळून जाण्यात यशस्वी ठरले तर एकास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. रात्री तो शुद्धीत आल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यानंतर जेवणाच्या वादातून हा प्रकार झाल्याचे समोर आले. दरम्यान, अटकेतील आरोपी अनिरुद्ध विश्वकर्मा याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असल्याचेही समोर आले आहे. त्याच्यावर चोऱ्या, घरफोड्यांचे गुन्हे दाखल आहेत तर त्याचे पळून गेलेले साथीदार हे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील असल्याचे त्याने चौकशीत सांगितले आहे. या फरार आरोपींचा शोध पोलीस घेत असून, वेगवेगळी पथके त्यांच्या मागावर आहेत.