ब्रेक द चेन अभियानातील हॅन्ड वॉश स्टेशन्स गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:18 IST2021-03-29T04:18:54+5:302021-03-29T04:18:54+5:30
उस्मानाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गास आळा बसावा, यासाठी नगरपालिकेच्या वतीने गतवर्षी मार्च महिन्यात ब्रेक द चेन अभियान राबविण्यात आले ...

ब्रेक द चेन अभियानातील हॅन्ड वॉश स्टेशन्स गायब
उस्मानाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गास आळा बसावा, यासाठी नगरपालिकेच्या वतीने गतवर्षी मार्च महिन्यात ब्रेक द चेन अभियान राबविण्यात आले होते. या अभियानातंर्गत शहरातील वर्दळीच्या ठिकाणी हॅन्ड वॉश स्टेशन्स उभे करण्यात आले होते. या ठिकाणी हात धुवण्यासाठी पाणी व सॅनिटायझरची सोय केली होती. अनेक नागरिक या ठिकाणी हात निर्जंतुकीकरण करीत होते. मात्र, जानेवारी महिन्यापासून रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने पालिकेने या टाक्या काढून नेल्या आहेत. मात्र, मार्च महिन्यापासून पुन्हा रुग्ण वाढू लागल्याने हॅन्डवॉश स्टेशन्स सुरू करण्यात यावे, अशी मागणी होऊ लागली आहे. गतवर्षी मार्च महिन्यापासून राज्यातील विविध जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला होता. वाढत्या संसर्गास आळा बसावा, यासाठी शासन व प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या जात होत्या. त्या अनुषंगाने उस्मानाबाद नगरपरिषदेच्या वतीने ब्रेक द चेन अभियान उपक्रम हाती घेण्यात आला होता. या अभिायानातंगर्त शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, राजमाता जिजाऊ चौक यासह १२ ठिकाणी पाण्याच्या टाक्या ठेऊन हॅन्डवॉश स्टेशन्स तयार करण्यात आले होते. या ठिकाणी हात धुण्यासाठी पाणी व साबण तसेच सॅनिटायझरची सोय उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे प्रवासी, पादचारी, शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणारे नागरिक, विद्यार्थी या ठिकाणी हात धुवत होते. हे स्टेशन्स मागील ९ ते १० महिने सुरळीत सुरू होते. मात्र, जानेवारी महिन्यापासून रुग्णांची संख्या कमी होताच, उभा करण्यात आलेल्या टाक्यात काढून नेण्यात आल्या आहेत. मात्र, मार्च महिन्यापासून पुन्हा शहरात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे वर्दळीच्या ठिकाणी पुन्हा हॅन्डवॉश स्टेशन्स सुरू करण्यात यावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.
जिल्हा परिषद तत्पर
कोरोनाचा विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्हा परिषदेच्या आवारात चार पेडल हँडवॉश स्टेशन उभारण्यात आलेले आहेत. या स्टेशनच्या टाक्यामध्ये नियमित लिक्विड टाकले जात आहे. तसेच, पाणीही भरले जात आहे.
पंचायत समितीत फक्त पाणी
शहरातील पंचायत समितीच्या आवारात हॅन्डवॉश स्टेशन उभारण्यात आलेले आहे. या स्टेशनच्या टाकीमध्ये लिक्विड टाकले जात नाही. केवळ हात धुण्यासाठी पाणी टाकण्यात येते. त्यामुळे अनेकांना या ठिकाणाहून हात धुऊनच जावे लागते.