गवार, वांगी, शेवग्याचे दर चढेच; हिरवी मिरचीचा तिखटपणाही वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:24 IST2021-01-13T05:24:26+5:302021-01-13T05:24:26+5:30

उस्मानाबाद : मागील दोन महिन्यांपासून शेवगा, गवारीचा बाजारात तुटवडा कायम आहे. त्यामुळे गवार व शेवगा ८० रुपये प्रतिकिलोने विकला ...

Guar, brinjal, sugarcane prices go up; The sharpness of green chillies also increased | गवार, वांगी, शेवग्याचे दर चढेच; हिरवी मिरचीचा तिखटपणाही वाढला

गवार, वांगी, शेवग्याचे दर चढेच; हिरवी मिरचीचा तिखटपणाही वाढला

उस्मानाबाद : मागील दोन महिन्यांपासून शेवगा, गवारीचा बाजारात तुटवडा कायम आहे. त्यामुळे गवार व शेवगा ८० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे तर हिरव्या मिरचीची आवक कमी असल्याने या मिरचीचा तिखटपणा वाढला असून, मिरचीची ६० रुपये किलोने विक्री होत आहे.

ऑक्टोबर महिन्यात परतीचा दमदार पाऊस झाल्याने प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मुबलक पाणीसाठा असल्याने अनेक शेतकऱ्यांनी फळभाज्या व पालेभाज्यांची लागवड केली. परिणामी, भाज्यांचे उत्पादन वाढले. मागणीच्या तुलनेत आवक मोठ्या प्रमाणात असल्याने भाज्यांचे दर दोन महिन्यांपासून उतरले होते. मात्र, वेळाअमावस्थाच्या तोंडावर भाज्यांच्या दरात काहीअंशी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात मेथी १० रुपयाला ३ जुड्या, कोथिंबीर, पालक १० रुपयाला २ जुड्या असा विकला जात होता. रविवारी बाजारात मेथी, शेपू, चुका १० रुपये जुडी तर पालक व कोथिंबीर ५ ते १० रुपये जुडीप्रमाणे विकली जात होती. कांदा, कारले, दोडका, शिमला मिरची ४०, भेंडी ५० रुपये प्रतिकिलोने विकण्यात आली. बाजारात वांगी, गवार, शेवग्याचा तुडवडा कायम असून, शेवगा, गवार, वांगी ८० रुपये किलो तर हिरव्या मिरचीची ६० रुपये किलोने विक्री होत होती.

चौकटी...

सफरचंद महागले

बाजारात सफरचंद १०० ते १४० रुपये किलो, ॲपल बाेर ५० रुपये, चमेली बोर ३० रुपये, डाळींब १२० ते १६० रुपये, संत्रे, चिकू ५० रुपये किलोने तर केळी ३० रुपये डझनप्रमाणे विकली जात आहेत.

टोमॅटो स्वस्त

बाजारात टोमॅटो, फ्लाॅवर, पत्ताकोबीची आवक वाढली आहे. त्यामुळे टाेमॅटो १० रुपये किलो, पत्ताकोबी २० रुपये, फ्लाॅवर २० रुपये किलोने विकला जात आहे. थंडीमुळे सध्या लिंबाला मागणी नसल्याने १० रुपये किलोने लिंबाची विक्री होत आहे.

तिळाला मागणी

खाद्यतेलाच्या दरात प्रतिदिन वाढ होत आहे. सोयाबीन तेल १२० ते १२५ रुपये, पामतेल ११०, सुर्यफूल १३० ते १३५, शेंगदाणा तेल १७० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. तूरडाळ ९५ ते ९८ रुपये, हरभरा डाळ ६५ ते ७० रुपये, उडीद डाळ १२० रुपये किलो, मूग ११० रुपये किलोवर पोहोचले आहेत. तिळाची १२० रुपये किलोने विक्री होत आहे.

कोट...

शेवगा, वांगी, गवार, वांग्याचे दर वाढले आहेत. पालेभाज्यांमध्येही काहीअंशी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर मात्र आवाक्यात आहेत. स्वस्त भाज्यांची खरेदी केली आहे. - प्रदीप जाधव, ग्राहक

हरभरा, तूर, मूग, उडीद डाळीचे दर स्थिर आहेत. खाद्यतेलाच्या दरात मात्र वाढ होत आहे. सोयाबीन तेल १२५, सुर्यफूल तेल १३०, शेंगदाणा तेल १७० रुपयांवर पोहोचले आहे.

- मचिंद्र तुंदारे

किराणा व्यावसायिक

मागील दोन ते अडीच महिन्यांपासून भाज्यांचे दर कमी झाले होते. मात्र, दोन दिवसांपासून पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. शेवगा, गवारी यांचा मागणीच्या तुलनेत तुटवडा आहे.

- महादेव साठे,

भाजी विक्रेते

Web Title: Guar, brinjal, sugarcane prices go up; The sharpness of green chillies also increased