पीक कर्ज वाटपात ग्रामीण बँकेची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:35 IST2021-08-19T04:35:31+5:302021-08-19T04:35:31+5:30
लोहारा : एकीकडे शेतकऱ्यांना बँका पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत असतानाच महाराष्ट्र ग्रामीण बॅकेच्या लोहारा ...

पीक कर्ज वाटपात ग्रामीण बँकेची आघाडी
लोहारा : एकीकडे शेतकऱ्यांना बँका पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत असतानाच महाराष्ट्र ग्रामीण बॅकेच्या लोहारा शाखेने मात्र तब्बल १४० टक्के पीक कर्जाचे वाटप करून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
लोकप्रतिनिधी, अधिकारी वारंवार बैठका घेऊन शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याबाबत बँकांना सूचना देतात. शिवाय, शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत वाटप नाही केल्यास, उद्दिष्ट अपूर्ण राहिल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील दिला जातो. परंतु, बँकांकडून मात्र वेगवेगळी कारणे पुढे करत पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जाते, असा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. विशेष म्हणजे, बँकेच्या ठरलेल्या एजंटामार्फेत गेले तरच कर्ज मिळते, अशीही काही शेतकऱ्यांची तक्रार आहे. परंतु, या सर्व बाबींना लोहारा शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँक अपवाद ठरली आहे. या बॅकेच्या कार्यक्षेत्रात लोहारा शहरासह लोहारा (खुर्द), मोघा (बु), मोघा (खुर्द), कास्ती (बु), कास्ती (खुर्द), मार्डी, नागराळ, बेंडकाळ, खेड, नागूर ही अकरा गावे येतात. या बँकेचे २ हजार शंभर खातेदार आहेत. यावर्षी या बँकेला पीक कर्ज वाटपाचे ८ कोटी २० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु, बँकेने प्रत्यक्षात १ हजार ६६ शेतकऱ्यांना ११ कोटी ८७ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप केले. एकूण उद्दिष्टापेक्षा हा आकडा ४० टक्के अधिक असून, यामुळे कोरोना, पाऊस यासारख्या नैसर्गिक संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.
शाखाधिकाऱ्यांचा केला सत्कार
महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १४० टक्के पीक कर्ज वाटप केले आहे. याबद्दल शाखाधिकारी महेश बोडगे यांचा जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक अविनाश माळी, माजी नगरसेवक अभिमान खराडे, श्रीशैल स्वामी, नारायण माळी यांनी सत्कार केला.
कोट.......
आमच्या बँकेला पीक कर्ज वाटपाचे उद्दष्ट ८ कोटी २० लाख रुपये होते. परंतु, प्रत्यक्षात ११ कोटी ८७ लाख रुपये पीक कर्ज १ हजार ६६ शेतकऱ्यांना वाटप केले आहे. बँकेने नेहमीच शेतकऱ्यांला मदतीचा हात देण्याचा प्रर्यत्न केला आहे. पीक कर्ज मिळवून देतो म्हणून कोणी पैशाची मागणी करत असेल तर थेट बँकेशी संपर्क साधावा.
- महेश बोडगे, शाखाधिकारी, लोहारा
केवळ कागदपत्रे पाहून कर्ज वाटप
महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी महेश बोडगे हे पीक कर्ज देताना नेहमीच सहकार्याची भूमिका ठेवतात. कुठल्याही मध्यस्थाशिवाय केवळ कागदपत्रे पाहून तातडीने पीक कर्जाचे वाटप केले जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत असल्याचे शरण्णाप्पा कबाडे, सहदेव सुरवसे, जगदिश पाटील या शेतकऱ्यांनी सांगितले.