सरकारने उस्मानाबादला वाऱ्यावर साेडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:29 IST2021-04-19T04:29:51+5:302021-04-19T04:29:51+5:30

उस्मानाबाद : महाविकास आघाडी सरकारने कोरोना महामारीच्या अभूतपूर्व आपत्कालीन काळात जिल्ह्यातील नागरिकांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. प्रतिदिन बाधितांची संख्या ...

The government blew up Osmanabad | सरकारने उस्मानाबादला वाऱ्यावर साेडले

सरकारने उस्मानाबादला वाऱ्यावर साेडले

उस्मानाबाद : महाविकास आघाडी सरकारने कोरोना महामारीच्या अभूतपूर्व आपत्कालीन काळात जिल्ह्यातील नागरिकांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. प्रतिदिन बाधितांची संख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी रेमडेसिविरचा तुटवडा आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची कमतरता आहे. असे असतानाही काेणीही मंत्री जिल्ह्याकडे फिरकायला तयार नाही. अशा काळातही शिवसेना, राष्ट्रवादीसह काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते मूग गिळून का गप्प आहेत, असा सवाल भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केला आहे.

जिल्हाभरात २५०० च्या आत चाचण्या होऊनदेखील ६५३ नवीन रुग्ण शनिवारी एका दिवसात सापडले, तर २० कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उस्मानाबादला अत्यंत कमी प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे. उमरगा, तुळजापूर, परांडा या उपजिल्हा रुग्णालयांच्या ठिकाणी तर अनेक दिवसांपासून पुरवठाच होत नाही. जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथेही गरजेच्या ५० टक्केही पुरवठा होत नाही. जिल्हा रुग्णालय आवारातील ऑक्सिजन प्लांट काही महिन्यांपूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित असताना शनिवारी कसेबसे याचे काम पूर्ण झाले. अशा अभूतपूर्व परिस्थितीत राज्य सरकार व राज्य सरकारचा प्रतिनिधी असल्यामुळे पालकमंत्र्यांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणे गरजेचे असते. २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण झाल्यानंतर पालकमंत्री पुन्हा जिल्ह्यात येऊ शकले नाहीत. त्यामुळे कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री आजारातून बरे होईपर्यंत इतर मंत्री जिल्ह्यासाठी प्राधिकृत करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे विनंती केली होती. २६ जानेवारीनंतर अद्याप जिल्ह्यात कोणतेही मंत्री आले नाहीत. इतर जिल्ह्यात पालकमंत्री दर आठवड्याला बैठका घेऊन जनतेच्या व प्रशासनाच्या अडचणी जाणून घेतात. त्या सोडविण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करतात. या आणीबाणीच्या काळात एकाही मंत्र्यांनी जिल्ह्यातील अडचणींबाबत येथे येऊन आढावा घेतलेला नाही, हे विशेष.

जिल्ह्यात शिवसेनेचे ३ आमदार व १ खासदार जनतेने निवडून दिलेले असताना शिवसेनेच्या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्यामुळे जनता वैतागलेली आहे. या अक्षम्य दुर्लक्षाबाबत उस्मानाबादकर सत्ताधाऱ्यांना कदापि माफ करणार नाहीत. जिल्ह्यातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना तुम्ही सर्व मूग गिळून गप्प का? असा सवाल उपस्थित करीत या कृतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून निषेध नाेंदवावा, असे आवाहन आ. पाटील यांनी केले.

Web Title: The government blew up Osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.