‘आदर्श गाव’ होण्यासाठी ग्रामस्वच्छतेला महत्त्व द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:36 IST2021-09-23T04:36:52+5:302021-09-23T04:36:52+5:30
तुळजापूर : आपले गाव आदर्श बनवायचे असेल, तर प्रत्येक सरपंचाने प्रथम स्वतः स्वच्छता पाळण्याबरोबरच गावात कशी स्वच्छता राखता येईल, ...

‘आदर्श गाव’ होण्यासाठी ग्रामस्वच्छतेला महत्त्व द्या
तुळजापूर : आपले गाव आदर्श बनवायचे असेल, तर प्रत्येक सरपंचाने प्रथम स्वतः स्वच्छता पाळण्याबरोबरच गावात कशी स्वच्छता राखता येईल, याकडे लक्ष द्यावे. गावात १०० टक्के शौचालये झाली पाहिजेत यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन आदर्श गाव पाटोदाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी केले.
तुळजापूर पंचायत समिती सभागृहात ‘आदर्श गाव पाटोदा संकल्पना’ या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे व सरपंचांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपसभापती दत्तात्रय शिंदे यांच्या वतीने उपस्थित सर्व सरपंचांना ‘ग्रामगीता, ‘असा आमचा पाटोदा’ ही पुस्तके देऊन व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
पेरे-पाटील म्हणाले, गावाच्या विकासासाठी आपल्यातील हेवेदावे दूर करून संघटितपणे काम करणे गरजेचे आहे. सध्या सरपंचांवरील नागरिकांचा विश्वास उडाल्याची खंत व्यक्त करून सरपंचांनी सर्वांना विश्वासात घेऊन अत्यंत प्रामाणिकपणे, नि:स्वार्थपणे व पारदर्शक पद्धतीने गावाचा कारभार केल्यास गावातील लोक सरपंचांवर विश्वास ठेवतील, असा आशावाद व्यक्त केला. गावकऱ्यांनीही १०० टक्के कर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी गटविकास अधिकारी प्रशातसिंग मरोड, सभापती रेणुकाताई भिवा इंगोले, उपसभापती दत्तात्रय शिंदे, रुग्णकल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले, सामाजिक कार्यकर्ते भिवा इंगोले, पंचायत समिती सदस्य सिद्रामाप्पा कोरे, कृषी विस्तार अधिकारी तांबोळी, काटीचे सरपंच आदेश कोळी, गोंधळवाडीचे सरपंच राजाभाऊ मोठे, युवराज शिंदे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जळकोटे यांनी केले. कृषी विस्तार अधिकारी तांबोळी यांनी आभार मानले.
‘मास्क’ला तिलांजली
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका अजून टळला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. यासाठी मास्कचा वापर करा, सुरक्षित अंतर राखा, सॅनिटायझरचा वापर करा, असे आवाहनही केले जात आहे; परंतु तुळजापूर पंचायत समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात माजी सरपंच भास्कर पेरे-पाटील, सभापती रेणुका इंगोले, उपसभापती दत्तात्रय शिंदेंसह उपस्थित पंचायत समिती सदस्य, सरपंच व नागरिकांनीही मास्क वापराकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.
210921\25451940-img-20210921-wa0041.jpg
उपस्थित सरपंचाना मार्गदर्शन करताना