आंदाेरा येथील कन्येने घातली कॅप्टन पदाला गवसणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:34 IST2021-05-11T04:34:53+5:302021-05-11T04:34:53+5:30
कळंब :वडिलांनी सैन्यदलात अधिकारी व्हायचे प्रयत्न केले. मात्र यश आले नाही. मुलीने मात्र डॉक्टर असतानाही जिद्दीने सैन्यदलात प्रवेश मिळविला, ...

आंदाेरा येथील कन्येने घातली कॅप्टन पदाला गवसणी
कळंब :वडिलांनी सैन्यदलात अधिकारी व्हायचे प्रयत्न केले. मात्र यश आले नाही. मुलीने मात्र डॉक्टर असतानाही जिद्दीने सैन्यदलात प्रवेश मिळविला, तो पण अधिकारी म्हणून. भारतीय सैन्य दलात ‘कॅप्टन’ म्हणून निवड झालेल्या आंदोरा येथील डॉ. किरण रविकांत काळे यांची ही भरारी खरोखरच प्रेरणादायी अशीच आहे.
अलीकडे प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. उद्योग असो की संशोधन अशा विविध प्रवर्गात त्यांच्या अनेक यशोगाथा समोर येत आहेत. प्रशासन, कार्पोरेट जगतामध्येही त्यांचा वावर आता नवा राहिलेला नाही. संरक्षण क्षेत्रातही यांचा उल्लेखनीय सहभाग दिसून येत आहे. तालुक्यातील आंदोरा येथील रहिवासी असलेल्या रविकांत रामभाऊ काळे यांच्या २५ वर्षीय डॉक्टर कन्येने यशाची भरारी घेत थेट भारतीय सैन्य दलात ‘कॅप्टन’ पदाला गवसणी घातली आहे.
आंदोरा येथील रविकांत रामभाऊ काळे हे कारागृह विभागात सांख्यिकी अन्वेषक म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेली त्यांची कन्या डॉ. किरण ही विविध खेळातही प्रावीण्य मिळविलेली.
हेच गुण ओळखत मावशी सुरेखा विजय दंडनाईक यांनी किरणला उस्मानाबाद येथील विद्यामाता शाळेत प्रवेश घ्यावयास लावला. तेथे अभ्यासासह नितीन जामगे या सहशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध खेळात प्रावीण्य मिळविले.
यानंतर पुढे उच्च माध्यमिक शिक्षण लातूरच्या दयानंद व शाहू महाविद्यालयात घेतलं. पुढे तेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ‘एमबीबीएस’ शिक्षण पूर्ण केले व औरंगाबाद येथे ‘पीजी’ची तयारी सुरू केली.
दरम्यानच्या काळात देशसेवेत सहभागी होण्याची इच्छा डॉ. किरण यांना स्वस्थ बसू देत नव्हती. यानंतर २०२० मध्ये सैन्यदलात अधिकारी पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली. यात ऑगस्टमध्ये ‘एएफएमएस’साठी चार दिवसांची मुलाखत दिली. तद्नंतर मेडिकल झालं अन् यशही मिळालं.
यात यश मिळाल्याने एक मे रोजी कॅप्टन पदाचे ऑफर लेटर प्राप्त झालं. लागलीच दुसऱ्या दिवशी खडकी पुणे येथे उपस्थिती नोंदविली. एकूणच जिद्द, परिश्रमाच्या बळावर ‘डॉक्टर’ झालेली किरण काळे यांनी आता सैन्यदलातील ‘एएमसीम’ध्ये ‘कॅप्टन’ पदाला गवसणी घातली आहे. ही यशोगाथा ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी अशीच आहे.
चाैकट...
वडिलांचे स्वप्न वास्तवात आणले....
डॉ. किरण रविकांत काळे यांचे आजोबा रामभाऊ काळे हे सैन्यदलात कार्यरत होते. तेथील सेवानिवृत्तीनंतर त्यांनी एसटी महामंडळात चालक म्हणून काम केले. यानंतर वडील रविकांत यांनी आपले मामा कर्नल भीमराव पवार यांच्या प्रेरणेने एनडीएच्या परीक्षा दिल्या. मात्र, प्रयत्न करूनही त्यांना सैन्यदलात अधिकारी होता आलं नाही. यानंतर ते कारागृह विभागात नियुक्त झाले. एकूणच आजोबा, वडिलांचे मामा यांची प्रेरणा घेत डॉ. किरण यांनी सैन्यदलात एक अधिकारी म्हणून प्रवेश करीत आपल्या वडिलांचे स्वप्न वास्तवात आणले आहे.
लहानपणापासून अंगी अष्टपैलूत्व...
डॉ. किरण यांच्या यशाचे आज्जी मालनबाई, आई उषा, वडील रविकांत, अनंत काळे, नमिता काळे यांच्यासह सर्व नातेवाईक, शिक्षकवृंद यांनी मोठं कौतुक केलं आहे. आंदोरा, कळंब शहर व पुणे या तीनही रहिवास असलेल्या ठिकाणी या निवडीचे स्वागत होत आहे. आपली मुलगी अष्टपैलू होती. शिक्षणासोबतच स्विमिंग, कराटे, ॲथलेटिक्स, बास्केट बॉल, थाळी व गोळा फेक, पेटिंग, नृत्य याची तिला केवळ आवडच होती असे नव्हे, तर यात नैपुण्यही मिळविले होते. यानंतर शिस्त, देशप्रेम, देशसेवा याला महत्त्व असलेल्या सैन्यदलात तिचे एक अधिकारी म्हणून पाऊल पडले आहे असे वडील रविकांत काळे यांनी सांगितले.