निराधार महिलेवर केले ग्रामपंचायतीने अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:34 IST2021-05-21T04:34:04+5:302021-05-21T04:34:04+5:30
आपसिंगा येथील एका पन्नासवर्षीय महिलेच्या पतीचे दीड महिन्यांपूर्वी दुर्धर आजाराने निधन झाले. यानंतर सदर महिला मूलबाळ नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील ...

निराधार महिलेवर केले ग्रामपंचायतीने अंत्यसंस्कार
आपसिंगा येथील एका पन्नासवर्षीय महिलेच्या पतीचे दीड महिन्यांपूर्वी दुर्धर आजाराने निधन झाले. यानंतर सदर महिला मूलबाळ नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील मार्डी येथील बहिणीकडे रहायला गेली होती. तेथे बुधवारी त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर मयत महिलेच्या बहिणीने त्यांचा मृतदेह टमटममधून अपसिंगा येथे आणला. ही माहिती मिळाल्यानंतर प्रारंभी मयत महिलेसोबत आलेल्या बहिणीसह इतर दोघांचीही अपसिंगा उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश माळी यांनी रॅपिड अँटिजन टेस्ट केली. यावेळी मयत महिलेच्या बहिणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर इतर दोघे निगेटिव्ह आल्याने मृत महिला कोरोना संशयित असे गृहीत धरण्यात आले. सद्य:स्थितीत कोरोनामुळे सख्खे नातेवाईक लांब जातात. त्यात या तर निराधार महिला. यामुळे ग्रामसेवक चैतन्य गोरे, ग्रामपंचायत सदस्य अमीर शेख, चाँदसाहेब शेख, ग्रामपंचायतचे शिपाई मलिक राजगुरू यांनी पुढाकार घेत पीपीई किट घालून त्या महिलेवर मुस्लीम धर्माच्या रीतीरिवाजप्रमाणे अंत्यसंस्कार केले.