इंधन दरवाढीचे सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांनाही चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:24 IST2021-06-05T04:24:08+5:302021-06-05T04:24:08+5:30

भूम : दिवसागणिक पेट्राेलच्या दरामध्ये झपाट्याने वाढ हाेऊ लागली आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांवरही हाेऊ लागला आहे. वाहतूक ...

Fuel price hikes hit traders as well as the general public | इंधन दरवाढीचे सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांनाही चटके

इंधन दरवाढीचे सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांनाही चटके

भूम : दिवसागणिक पेट्राेलच्या दरामध्ये झपाट्याने वाढ हाेऊ लागली आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांवरही हाेऊ लागला आहे. वाहतूक खर्च वाढल्याने वस्तूंचे दरही वधारले आहेत. परिणामी सामान्य व्यक्तींच्या खिशाला अधिकची झळ बसू लागली आहे. एवढेच नाही तर शेतीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांनाही जास्तीचे पैसे माेजावे लागत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळते.

काेराेनाच्या संकटामुळे एकीकडे लाेक बेजार झाले आहेत. अर्थकारण पूर्ण काेलमडून पडले आहे. अशा अवस्थेत सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी पाऊले सरकारने उचलणे गरजेचे आहे. परंतु , तूर्तास तसे हाेताना दिसत नाही. उलट इंधन दरवाढीच्या माध्यमातून आर्थिक संकटात सापडलेल्या व्यापाऱ्यांसाेबतच सर्वसामान्यांना जास्तीच्या आर्थिक खाईत लाेटण्याचे काम हाेताना दिसत आहे. साधारणपणे पंधरा ते वीस दिवसांपूर्वी शंभराच्या आत असलेल्या पेट्रोलने केव्हाच शंभरी पार केली. आजघडीला एका लीटर पेट्राेलसाठी ग्राहकांना १०१ रूपये ४४ पैसे माेजावे लागत आहेत. डिझेलचे दरही काही स्थिर नाहीत. पेट्राेलच्या मागाेमाग डिझेलही महाग हाेत चालले आहे. याचा फटका केवळ वाहनधारकांनाच बसत आहे, हे म्हणणे वरवरचे ठरेल. व्यापारी आपल्या दुकानातील साहित्य बाहेरच्या राज्यातून वा मुंबई, पुणे यासारख्या माेठ्या बाजारपेठेतून खरेदी करतात. अशा व्यापाऱ्यांना इंधन दरवाढीची झळ बसू लागली आहे. वाहतूक खर्चात सध्या माेठी वाढ झाली आहे. दरम्यान, हा वाहतूक खर्च व्यापारी ग्राहकांकडून वसूल करतात. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत सर्वच वस्तूंच्या दरामध्ये वाढ झाली आहे. परिणामी ग्राहकांना आता जास्तीचे पैसे माेजावे लागत आहेत. इंधन दरवाढ अशीच सुरू राहिल्यास वाहनधारकांना आपली वाहने गेटच्या बाहेर काढणे अशक्य हाेईल. त्यामुळे केंद्रात सत्तेत येण्यापूर्वी इंधन दरवाढ कमी करू,अशा वल्गना करणारे सरकार सत्तेवर आल्यानंतर मात्र कुठल्याही स्वरूपाची ठाेस पाऊले उचलताना दिसत नाही, हे विशेष.

चाैकट...

शेतीची मशागतही महागली...

साधारपणे ६ महिन्यांपूर्वी डिझेलचा दर कमी हाेता. तेव्हा ट्रॅक्टरधारक नांगरणीसाठी एकरी तेराशे ते चाैदाशे रूपये घेत हाेते. परंतु, डिझेलच्या दरात झपाट्याने वाढ हाेऊ लागल्यानंतर नांगरणीचा दर प्रति एकर १ हजार ७०० रूपये एवढा केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचेही अर्थकारण बिघडले आहे.

काेट...

पूर्वी दाेनशे रुपयांचे पेट्राेल गाडीत भरल्यानंतर चार-पाच दिवस निघत हाेते. परंतु, मागील काही दिवसांत पेट्राेलने शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे सध्या दाेनशे रुपयांचे पेट्राेल भरल्यानंतर दाेन ते तीनच दिवस पुरते. एकूणच आमची निम्मी कमाई इंधनावर खर्च हाेऊ लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यात लक्ष घालून महागाई नियंत्रणात आणावी.

-साेमनाथ टकले, भूम.

केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना, विद्यमान प्रधानमंत्री इंधन दरवाढीला सरकारचे धाेरण जबाबदार असल्याचे सांगत हाेते. सत्तेत येताच दरवाढ कमी करू, अशी वल्गनाही ते करीत हाेते. परंतु, सध्या इंधनाच्या दराने उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्य बेजार झाले आहेत. सर्वसामान्यांची ५० टक्के कमाई इंधनावर खर्च हाेत आहे. असे असतानाही केंद्रातील सरकार चकार शब्द काढायला तयार नाही. तसेच इंधन दरवाढ कमी करण्याचे नाव घेत नाही.

-गणेश शाळू, जिल्हा सरचिटणीस, युवक काँग्रेस

एकीकडे सरकार शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढवावे, असे सांगत आहे. यंत्रे घेण्यासाठी थाेडे बहुत अनुदान दिले जात आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळले आहेत. असे असतानाच दुसरीकडे इंधनाचे दर प्रचंड वाढविले आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करणे अवघड हाेऊन बसले आहे. इंधन दरवाढ कमी करण्याच्या अनुषंगाने ठाेस उपाययाेजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

-तानाजी पाटील, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना.

Web Title: Fuel price hikes hit traders as well as the general public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.