परंडा (जि. धाराशिव) : परंडा तालुक्यातील शेळगाव (माणिकनगर) येथील एका व्यसनी बापाने आपल्याच १० वर्षीय मुलीवर कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना रविवारी सायंकाळी उजेडात आली आहे. घटनेची माहिती मिळताच आंबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी पित्यास ताब्यात घेतले आहे.
शेळगाव येथील गौरी जाधव ही चौथीच्या वर्गात शिकत होती. तिचे वडील ज्ञानेश्वर जाधव यांना दारूचे व्यसन असल्याने गौरी तिच्या आजीकडे राहत होती. दरम्यान, आरोपी ज्ञानेश्वर जाधव हा २८ जून रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास मुलीकडे गेला होता. येथे त्याने धारदार कुऱ्हाडीने गौरीच्या डोक्यात घाव घालून तिचा खून केला व मृतदेह झाकून ठेवून त्याची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत होता.
प्रकरण दडपण्यासाठी ही घटना कोणासही न सांगण्याबाबत त्याने गौरीच्या आजीला धमकी दिली होती. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असताना रविवारी सायंकाळी याबाबतची माहिती आंबी पोलिसांना मिळाली. यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून आरोपी ज्ञानेश्वर जाधव यास ताब्यात घेत पंचनामा सुरू केला. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया आंबी ठाण्यात सुरू होती.