जिल्ह्यातील २५९ अतिक्रमित शेत रस्ते घेणार मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:30 IST2020-12-29T04:30:47+5:302020-12-29T04:30:47+5:30
उस्मानाबाद : ग्रामीण भागामध्ये शेताकडे जाण्यासाठी गाडी मार्ग व पाऊलवाटा परंपरेने आणि वहिवाटीने निश्चित झालेल्या आहेत. या सर्व रस्त्यांच्या ...

जिल्ह्यातील २५९ अतिक्रमित शेत रस्ते घेणार मोकळा श्वास
उस्मानाबाद : ग्रामीण भागामध्ये शेताकडे जाण्यासाठी गाडी मार्ग व पाऊलवाटा परंपरेने आणि वहिवाटीने निश्चित झालेल्या आहेत. या सर्व रस्त्यांच्या नोंदी महसुली अभिलेखात पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. वाढती लोकसंख्या तसेच जमिनीच्या वाढत्या किमती यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतर स्ते आणि शेतीकडे जाणाऱ्या मार्गांवर अतिक्रमणे केली आहेत. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना रस्त्यांमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हा प्रश्न साेडविण्यासाठी जिल्हाधिकारी डाॅ. काैस्तुभ दिवेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली २५९ अतिक्रमित शेत रस्ते खुले करण्याची धडक माेहीम हाती घेण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर जाण्यासाठी आणि शेतातील मालवाहतूक करण्यासाठी रस्ते अतिक्रमणमुक्त हाेणे गरजेचे आहे. जिल्ह्यामध्ये गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण झालेले तसेच बंद झालेले गाडी रस्ते, शेत रस्ते व शेतावर जाण्याची पाऊलवाट लोकसहभागाद्वारे मोकळी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडून जिल्ह्यातील अतिक्रमण करण्यात आलेले आणि बंद झालेले शेत रस्ते तसेच पायमार्ग यांची माहिती गावनिहाय संकलित करण्यात आली आहे. अशा रस्त्यांची संख्या सुमारे २५९ एवढी आहे. हे सर्व रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांची बैठक घेतली. या बैठकीत शेत रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यसाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व मंडळ अधिकारी यांनी एका आठवड्यात शिवारफेरी घेऊन कार्यवाही केली जाणार आहे. अतिक्रमण झालेले रस्ते मोकळे करून देण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:हून पुढे यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डाॅ. दिवेगावकर यांनी केले आहे.
चाैकट..
तर कायदेशीर कारवाई हाेणार...
शेतकऱ्यांनी स्वत:हून रस्ते मोकळे करून न दिल्यास अतिक्रमित आणि बंद झालेले रस्ते मोकळे करण्याबाबत कायदेशीर तरतुदींचा आधार घेऊन हे शेत रस्ते मोकळे करण्यात येतील. अतिक्रमणमुक्त रस्त्यांचे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेअंतर्गत मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे खेडेगावातील शेताकडे जाण्यासाठी असणारी रस्त्यांची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे.