चौघे आजमावताहेत दोन ठिकाणी नशीब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:46 IST2021-01-08T05:46:05+5:302021-01-08T05:46:05+5:30
पारगाव : येथील ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी ५१ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले असून, सध्या प्रत्यक्ष गाठीभेटींसोबतच समाजमाध्यमाद्वारे प्रचाराची रणधुमाळी सुरू ...

चौघे आजमावताहेत दोन ठिकाणी नशीब
पारगाव : येथील ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी ५१ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले असून, सध्या प्रत्यक्ष गाठीभेटींसोबतच समाजमाध्यमाद्वारे प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्याचे दिसत आहे. दरम्यान, भाजपाप्रणीत पॅनलचे चार उमेदवार दोन-दोन ठिकाणांहून नशीब आजमावत असल्याचेही दिसत आहे.
सुरुवातीला या निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपा या तीन पक्षांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होईल, असे चित्र होते. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मात्र अनेकजण स्वतःच्या उमेदवारीवर ठाम राहिल्याने काही ठिकाणी चौरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती रंगल्या आहेत. भाजपाचे महादेव आखाडे, आशाबाई आखाडे, समाधान माळी व मंजूषा जाधव हे चार उमेदवार प्रत्येकी दोन-दोन ठिकाणांहून नशीब आजमावत आहेत.
वाशी तालुक्यातील पारगाव ही मोठी ग्रामपंचायत आहे. येथे जनकापूरसह एकूण पाच प्रभाग असून, निवडून द्यावयाची सदस्यसंख्या १३ आहे. यासाठी ५१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या ग्रामपंचायतीवर आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आ. राहुल मोटे यांचे वर्चस्व राहिलेले आहे. सध्या राष्ट्रवादी पक्षाकडून पाचही प्रभागांत उमेदवार देऊन पॅनल उभा केला आहे. तर उमेदवारी न मिळाल्याने महादेव मोटे व राष्ट्रवादीचेच समाधान मोटे यांनी स्वतंत्र चूल मांडली आहे. शिवसेनेच्या गोटातही पदाधिकाऱ्यांनी आपापल्या सोयीनुसार निवडणुकीत उडी घेतल्याचे दिसत आहे. यामुळे अनेक प्रभागात एका जागेसाठी कुठे पाच जण तर कुठे सहा जणही रिंगणात दिसत आहेत. कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा सचिव कॉ. पंकज चव्हाण यांनीही आपले तीन उमेदवार उभे केले आहेत. एकंदरीत या निवडणुकीत उमेदवारांची संख्या लक्षणीय असून, प्रचारासाठी समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे पहावयास मिळत आहे.