पंधरा दिवसांत नवीन उपकेंद्र पडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST2021-07-09T04:21:48+5:302021-07-09T04:21:48+5:30
उमरगा : येथे नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या वीज उपकेंद्रात १५ दिवसांतच पुन्हा बिघाड होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे कामाच्या ...

पंधरा दिवसांत नवीन उपकेंद्र पडले बंद
उमरगा : येथे नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या वीज उपकेंद्रात १५ दिवसांतच पुन्हा बिघाड होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे कामाच्या दर्जाबाबतच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. या बिघाडामुळे गुरुवारी शहरातील न्यू बालाजी नगर भागातील वीज पुरवठा आठ तास बंद होता.
शहरात वीज पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपकेंद्रातील ब्रेकर नादुरुस्त झाल्याने सोमवारपासून हे उपकेंद्र बंद झाले आहे. यामुळे तीन दिवसांपासून अर्ध्या शहराचा वीज पुरवठा बंद झाला. जुन्याच पद्धतीने शहरात पुन्हा वीज पुरवठा सुरू करण्यात आला. दरम्यान, गुरुवारी सकाळी ७ वाजता न्यू बालाजी नगरमधील वीज गायब झाली. आठ तासानंतर दुपरी साडेतीनच्या दरम्यान येथील वीज पुरवठा सुरू झाला. यामुळे पुन्हा शहरात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे.
शहर व परिसरात विजेचा अतिरिक्त भार वाढल्याने सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. यापूर्वी १७०- १८० ॲम्पियर असलेला विजेचा भार २०० ॲम्पियरपेक्षा पुढे गेल्याने विजेची समस्या निर्माण होत होती. त्यामुळे अभियंता सूरज मोहिते यांनी शहरासाठी नवीन उपकेंद्राचा प्रस्ताव पाठवून दिला होता. आ. ज्ञानराज चौगुले यांनी नवीन उपकेंद्र मंजूर करून घेतले; मात्र या उपकेंद्राचे काम तब्बल अडीच वर्षे रखडले होते. उमरगा शहरातील वीज पुरवठ्यासाठी १७ जून रोजी नवीन ३३/११ के. व्ही. वाहिनीची चाचणी घेण्यात आली. त्यावर (दत्तमंदिर फिडर) गुंजोटी रोड, दत्तमंदिर, नवीन आरोग्य नगर, चौरस्ता, बिरुदेव मंदिर परिसरातील वीज पुरवठा चालू करण्यात आला होता. सोमवारी रात्रीपासून नवीन उपकेंद्र बंद पडले. यामुळे पुन्हा विजेचा लपंडाव सुरू झाला आहे.