काेराेना लसीचा १६ हजार व्यक्तींना पहिला डाेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:57 IST2021-03-13T04:57:42+5:302021-03-13T04:57:42+5:30
उस्मानाबाद : कोविडची लस घेण्यासाठी नोंद करावयाच्या संगणकीय प्रणालीमध्ये बदल करून ही प्रणाली आता अधिक सुलभ करण्यात ...

काेराेना लसीचा १६ हजार व्यक्तींना पहिला डाेस
उस्मानाबाद : कोविडची लस घेण्यासाठी नोंद करावयाच्या संगणकीय प्रणालीमध्ये बदल करून ही प्रणाली आता अधिक सुलभ करण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना नजीकच्या केंद्रावर लस घेता येईल. जिल्हा ग्रामीण व शहरी भागातील शासकीय रुग्णालयांबरोबरच खाजगी रुग्णालयातही लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यात १६ हजार ६३५ लाभार्थ्यांना पहिला तर ४ हजार २६६ लाभार्थ्यांना दुसराही डोस दिला आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसीचे जिल्ह्यात ५१ हजार ७७० डोस उपलब्ध आहेत.
या लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मार्च २०२१ पासून देशभर सुरू झाला आहे . या टप्प्यामध्ये ज्येष्ठ नागरिक म्हणजेच ज्यांचे वय ६० वर्षापेक्षा अधिक आहे, त्यांना कोविड-१९ ची लस दिली जात आहे. याच बरोबर ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील नागरिक ज्यांना दुर्धर आजारासाठी उपचार सुरू आहेत आणि उपचाराखाली आजार नियंत्रणात आहेत, अशा नागरिकांनाही लस दिली जात आहे. ज्या आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांनाही या टप्प्यामध्ये लस दिली जात आहे. लसीकरणासाठी नोंद करावयाच्या पूर्वीच्या सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये काही बदल करण्यात आला आहे. त्यासाठी नवीन मॉडिफाइड कोविन २.० या नावाने सॉफ्टवेअर पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलमुळे लाभार्थ्यांना त्यांची लसीकरणाची नोंदणी करणे अत्यंत सुलभ झाले आहे. यामध्ये दोन प्रकारे नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. संकेत स्थळावर जाऊन स्वतःची नोंदणी केल्यानंतर जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन कोणत्याही दिवशी लस घेता येणार आहे. दरम्यान, अधिकाधिक व्यक्तींनी ही लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनमंत वडगावे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील आणि जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.
चाैकट...
ही कागदपत्रे ठेवा साेबत...
कोविड-१९ लसीकरण सत्राच्या ठिकाणी जाऊन नोंदणी करताना किंवा लस घेताना काही कागदपत्रे सोबत बाळगणे आवश्यक आहे. यामध्ये ओळखपत्र यात पॅन कार्ड, मतदाता कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासबुक यांच्यापैकी कोणतेही एक पण आधार कार्ड सोबत असणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांना हे कागदपत्र पुरेसे ठरतात. दुर्धर आजाराच्या ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांसाठीही ओळखीसाठी सांगितलेल्या कागदपत्रांच्या सोबतच त्यांच्या आजाराबाबतचे नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायिकाचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक आहे. लाभार्थी आरोग्य कर्मचारी किंवा फ्रन्टलाइन वर्कर या गटातील असल्यास त्यांना या ओळखपत्रांसोबतच त्यांच्या नोकरीच्या कार्यालयाचे ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे.
व्याप्ती वाढविली...
या टप्प्यामध्ये लसीकरण सत्राच्या ठिकाणांची व्याप्ती देखील वाढविण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय यांच्यासोबतच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर देखील कोविड-१९ लसीकरण सत्र सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनाही त्यांच्या नजीकच्या ठिकाणी लस घेणे शक्य झाले आहे. पूर्वी कार्यरत असलेल्या नऊ ठिकाणांव्यतिरिक्त नव्याने येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, तीन ग्रामीण रुग्णालये, ३७ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि एका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड-१९ लसीकरण सत्र सुरू करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आठवड्यातील ठराविक दोन दिवशी हे सत्र सुरू असणार आहे.