रोहित्राला आग; दुसऱ्या दिवशी गाव अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:31 IST2021-04-15T04:31:15+5:302021-04-15T04:31:15+5:30
आलूर येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रातून केसरजवळगा गावाला वीजपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या तीन वर्षापासून आलूर उपकेंद्रांतील रोहित्रावर भार ...

रोहित्राला आग; दुसऱ्या दिवशी गाव अंधारात
आलूर येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रातून केसरजवळगा गावाला वीजपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या तीन वर्षापासून आलूर उपकेंद्रांतील रोहित्रावर भार वाढल्याने दर वर्षी ऑक्टोबर ते मे या महिन्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. या भागातील गावात सिंगल फेज तर शेतीसाठी थ्रीफेजचा वीजपुरवठा केला जातो. मात्र, थ्रीफेजचा वीजपुरवठा उपकेंद्राच्या निर्मितीपासून एकदाही पूर्णपणे आठ तास झाला नाही. गावातील रोहित्रावर क्षमतेपेक्षा अधिक भार आहे. त्यामुळे या उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या गावात सुरळीत व योग्य दाबाने वीजपुरवठा होण्यासाठी रोहित्राची क्षमता वाढ होणे आवश्यक आहे. रोहित्रावरील भार वाढल्याने व विजेच्या कमी अधिक दाबामुळे अनेक शेतकऱ्यांचे वीजपंप जळाले असून, वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.
मंगळवारी वादळी पावसामुळे केसरजवळगा येथील वीजपुरवठा दुपारी तीन वाजता खंडित झाला होता. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी दहा वाजता तो पूर्ववत झाला. माो, यानंतर उपकेंद्रावर भार वाढल्याने वारंवार वीज खंडित होऊन केसरजवळगा गावातील रोहित्राला सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. तो रात्री आठ पर्यंत बंदच होता. सलग दोन दिवस गावात रात्री वीज खंडित झाल्याने नागरीकांचे हाल होत आहेत. उकाड्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.
कोट....
केसरजवळगा येथील रोहित्राला आग लागल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. आलूर उपकेंद्रावर भार वाढल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. उपकेंद्रांची क्षमता वाढ करण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, आतापर्यंत क्षमता वाढ झाली नसल्याने वारंवार वीज खंडित होत आहे.
- सागर सायगावकर, कनिष्ठ अभियंता, मुरूम