सव्वा महिन्यात लाखाचा दंड केला वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:33 IST2021-04-07T04:33:27+5:302021-04-07T04:33:27+5:30
उमरगा : कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार उमरगा शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई करण्यात ...

सव्वा महिन्यात लाखाचा दंड केला वसूल
उमरगा : कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार उमरगा शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. पोलिस व पालिका प्रशासनाने १९ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत दुकानदार, दुचाकीस्वार, मंगल कार्यालय आदींवर कारवाई करून जवळपास एक लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कोरोनाच्या वाढत चाललेला संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षित अंतर व मास्कचा वापर सर्वाना बंधनकारक करण्यात आला आहे. कोरोना नियमांचे कटाक्षाने पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश पोलीस व पालिका प्रशासनास आहेत. त्यानुसार उमरगा शहरात १९ फेब्रुवारीपासून संयुक्त पथकाद्वारे कारवाई सुरू आहे. पोलीस व पालिकेने केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी विनामास्क दुचाकी व चारचाकी प्रवास करणाऱ्या २०० जनांवर कारवाई करून ४९ हजार ४०० रुपये दंड वसूल केला तर पालिका प्रशासनाने विनामास्क व्यापार करणारे दुकानदार, गर्दीचे नियम टाळून कार्यक्रमास परवानगी देणारे मंगल कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व वाहनधारकांवर कारवाई करून ५१ हजार ७०० रुपये असा एकूण एक लाख एक हजार शंभर रुपये दंड वसूल केला.
चौकट........
दंड टाळण्यासाठी प्रतिष्ठा पणाला
शहरातील एका मंगल कार्यालयावर कोरोना नियमांचे उल्लंघन करून पन्नास पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यास परवानगी दिल्याबद्दल पालिका प्रशासनाने २६ फेब्रुवारी रोजी मंगल कार्यालयाचे मालक व कार्यक्रम घेणारे दोघे अश्या तिघांवर दंडात्मक कारवाई करून सात हजार रुपये दंड केला. परंतु, मंगल कार्यालयाच्या मालकाने प्रतिष्ठा पणाला लावून पालिका प्रशासनाला दंड पावती रद्द करण्यास भाग पाडले. दरम्यान, तहसीलदार संजय पवार यांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत १० मार्च रोजी पुन्हा त्या मंगल कार्यालयाच्या मालकाकडून सात हजार रुपये दंड वसूल केला.