७५२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:37 IST2021-01-16T04:37:16+5:302021-01-16T04:37:16+5:30

उमरगा - तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या ३०४ जागेसाठी शुक्रवारी शांततेत मतदान पार पडले. ७६.३३ टक्के मतदारांनी आपला हक्क बजाविला. सर्व ...

The fate of 752 candidates is locked in the voting machine | ७५२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

७५२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

उमरगा - तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या ३०४ जागेसाठी शुक्रवारी शांततेत मतदान पार पडले. ७६.३३ टक्के मतदारांनी आपला हक्क बजाविला. सर्व ग्रामपंचायतीतील मिळून ७५२ मतदारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.

कोरोनाच्या प्रकोपानंतर निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींची सत्ता मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली हाेती. गावचा कारभार हाकण्यासाठी गावागावातून मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी भाऊगर्दी केली होती. ३० डिसेंबर रोजी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख होती. तर ३१ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी करण्यात आली. ४ जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. यावेळी ४९ पैकी मुळज, बलसूर, जकेकूर, मातोळा, जकेकूरवाडी, चिंचकोटा, एकोंडी- एकोंडीवाडी, कोळसूर (गु), पळसगाव, भिकारसांगवी, बाबळसूर या आकरा ग्रामपंचायती बिनविराेध निघाल्या. उर्वरित तुरोरी, गुंजोटी, पेठसांगवी, दाळींब, कदेर, नाईचाकुर, तलमोड, दाबका, बेडगा, कुन्हाळी, कोळसुर (क.), समुद्राळ, वागदरी, जगदाळवाडी, कवठा, गुरुवाडी (चें.), डिग्गी, व्हंताळ, कराळी, रामपूर, दगड धानोरा-मानेगोपाळ, सुपतगाव, हिप्परगा राव, भगतवाडी-कोळेवाडी-चिरेवाडी, मुरळी, थोरलीवाडी, सावळसुर, कदमापूर-दुधनाळ, गणेशनगर, नाईकनगर (मु.), काळालिंबाळा, गुगळगाव, जवळगा बेट, बोरी, नागराळ, कडदोरा, हंद्राळ व आष्टा (ज.) या ३८ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. १४३ प्रभागांतील ३०४ जागेसाठी ७५२ उमेदवार निवडून रिंगणात होते. निवडणूक प्रक्रियेसाठी ५७२ अधिकारी व कर्मचारी व १५० पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. ५० अतिरिक्त राखीव कर्मचारी तैनात हाेते. अशा तगड्या बंदाेबस्तात शुक्रवारी शांततेत मतदान पार पडले. ३१ हजार ५३३ स्त्री मतदार तर ३५ हजार ५८८ पुरुष मतदारांपैकी ७६.६३ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. थोरलीवाडी येथे तीन दिवसांपूर्वी एकाचा खून झाल्याने तालुक्यातील पोलिस यंत्रणा सतर्क झाली होती. आज वागदरी येथील किरकोळ वादावादी वगळता शांततेत मतदान पार पडले.

चाैकट..

सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत९ टक्के मतदान झाले होते. साडेअकरा वाजता एकोणतीस तर दीड वाजेच्या सुमारास ५२ व साडेतीन वाजेपर्यंत ६७ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. सायंकाळी साडेपाच वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतर एकूण किती टक्के मतदान झाले याची प्राथमिक माहिती घेतली असता जवळपास ७६.६३ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती पथनिर्देशक तथा तहसीलदार संजय पवार यांनी दिली.

Web Title: The fate of 752 candidates is locked in the voting machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.