काक्रंबा (जि. धाराशिव) : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा देखील पवनचक्कीच्या वादाच्या पार्श्वभूमीतून खून झाल्याची घटना ताजी असताना तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर गुरूवारी रात्री दाेन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चाैघांनी जीवघेणा हल्ला केला. कारच्या काचेवर अंडी, दगड, पेट्राेलचे फुगे मारून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी स्पाॅटवर दाखल हाेत तपास सुरू केला आहे. पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाला असावा, असा संशय सरपंच निकम यांना आहे.
मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम आणि त्यांचे प्रवीण इंगळे हे दाेघे गुरूवारी रात्री कारमधून तुळजापूरहून जवळगा गावाकडे जात हाेते. याचवेळी कारच्या दाेन्ही बाजुने दाेन दुचाकी आल्या. दाेन्ही गाड्यांवर प्रत्येकी दाेघे दुचाकीस्वार हाेते. त्यांनी सातत्याने हाॅर्न देण्यास सुरू केल्यानंतर सरपंच निकम यांनी आपल्या कारचा स्पीड कमी करून त्यांना पुढे जाण्यासाठी ‘साईड’ दिली. जवळ येताच दुचाकीस्वारांनी कारच्या काचेवर गड मारला. फुटलेल्या काचेतून त्यांनी पेट्राेलचे फुगे आत फेकले. संशय आल्यानंतर सरपंच निकम यांनी गाडीची स्पीड वाढविला. ताेवर दुसऱ्या दुचाकीवरील एकाने समाेरच्या काचेवर अंडे फेकले. त्यामुळे रस्त्यावरचे काहीच दिसत नव्हते. परिणामी कारचा स्पीड पुन्हा कमी झाला.
हीच संधी साधत हल्लेखाेरांनी दगड व पेट्राेलचे फुगे मारून कार पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र,सरपंच निकम यांनी प्रसंगावधान राखत कार थांबविली नाही. त्यामुळे दाेघांचेही प्राण वाचले. दरम्यान, हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून झाला असावा, असा माझा संशय असल्याचे निकम म्हणाले. अशा पद्धतीने जीवघेणे हल्ले हाेणार असतील तर गावपातळीवर काम कसे करावे, असा सवालही त्यांनी केला.