लोहारा : श्रावण हा सणासुदीचा महिना म्हणून ओळखला जातो. याच महिन्यात महागाईने कळस गाठला असून, खाद्यतेलाच्या भावात वाढ होत चालली असतानाच श्रावणातील उपवासासाठी लागणारे भगर, साबुदाणा, शेंगदाणेदेखील महागले आहेत. यामुळे उपवास करणेसुध्दा सर्वसामान्यांना न परवडणारे झाले आहे.
लोहारा शहरात ५५पेक्षा अधिक किराणा दुकाने आहेत. यासाठी लागणारा साबुदाणा, भगर, शेंगदाणे, साखर, खाद्यतेल हे सर्व पदार्थ परजिल्ह्यातून म्हणजे लातूर, सोलापूर येथून येतात. श्रावण महिन्यात अनेकजण उपवास धरतात. नेमक्या याच महिन्यात दरवाढीचा आलेख वाढत चालला आहे. साबुदाण्याचा भाव ३ ते ५ रुपयानी वाढला असून, साखर किलोमागे २ रुपयांनी वाढली. शेंगदाणे ५ रुपयांनी वाढले, तर खाद्यतेलाचे दर लीटरमागे १० ते १५ रुपयांनी वधारले आहेत. भगर तर चक्क ३० ते ३५ रुपयांनी महागली आहे. यामुळे श्रावण महिना हा उपवासाचा आहे की उपासमारीचा, असा सवाल सर्वसामान्यातून केला जात आहे.
आवक घटली, मागणी वाढली
भगर
भगरीचे भाव स्थिर होते. परंतु, मागील महिनाभरात यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
सध्या भगरीचा भाव हा १०० ते ११० रुपये किलो आहे. यामध्ये २ ते ३ प्रकार आहेत.
शेंगदाणे
शेंगदाण्याचा सध्याचा भाव १०० रुपये किलो आहे. याचे दर ५ ते १० रुपयांनी कमी झाले आहेत.
तरीही ग्राहक शेंगदाणे पूर्वीप्रमाणे खरेदी करताना दिसत नाही. लागेल तेवढेच घेत असल्याचे चित्र आहे.
साबुदाण्याचा भाव स्थिर
उपवासामध्ये भगरीपेक्षा साबुदाण्याला मागणी अधिक वाढली आहे. कारण, त्याचा भाव स्थिर आहे.
साबुदाणा किलोमागे २ ते ५ रुपयांनी वाढला असला तरी प्रतिकिलोचा दर ६० रुपये आहे.
मागणी दुप्पट वाढली
श्रावण हा उपवासाचा महिना असतो. या महिन्यात साबुदाणा, भगर व शेंगदाण्याची मागणी अधिक असते. भगर महागली असल्याने ग्राहक साबुदाणा खरेदीवर अधिक भर देत असल्याचे चित्र आहे.
- सुजित माशाळकर, किराणा व्यापारी, लोहारा
साबुदाणा
पूर्वी ५५
आता ६०
भगर
पूर्वी ८५
आता ११०