पीकविम्यासाठी आता ग्राहकमंचाकडे शेतकऱ्यांची धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:59 IST2021-02-06T04:59:54+5:302021-02-06T04:59:54+5:30
सन २०२० मधील खरीप हंगामात सोयाबीन, उडीद, मूग पीक काढणीला आले असतानाच, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी ...

पीकविम्यासाठी आता ग्राहकमंचाकडे शेतकऱ्यांची धाव
सन २०२० मधील खरीप हंगामात सोयाबीन, उडीद, मूग पीक काढणीला आले असतानाच, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली. या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेले पीक वाया गेले. नैसर्गिक संकटात पिके गेली, तरी जास्त आर्थिक झळ सोसावी लागू नये, यासाठी तालुक्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. अतिवृष्टी झाल्याने पीकविमा मिळणे अपेक्षित होते, परंतु विमा कंपनीने या वर्षीपासून पिकाचे नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत कंपनीला ऑनलाइन तक्रार द्यायची, तरच विमा मिळणार, या नियमाचा दाखला देऊन विमा नाकारला. ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड फोन नाही. फोन आहेत, त्यांच्याकडे ॲप नाही. बहुतांश जणांना ऑनलाइन तक्रार ही बाबच माहिती नाही. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. मात्र, विमा कंपनीच्या अटीमुळे शेतकऱ्यांना यंदा विमा मिळालेला नाही. ही अट शिथिल करून नुकसान भरपाई म्हणून विमा द्यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यावरही कोणतीच कार्यवाही झाली नाही. या निवेदनाची ना प्रशासनाने दखल घेतली ना विमा कंपनीने. त्यामुळे अतिवृष्टीचा फटका बसलेले तालुक्यातील उमरा येथील शेतकरी प्रवीण जाधव यांनी शेतकऱ्यांना विमा मिळावा, यासाठी थेट ग्राहक न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली आहे. त्यांनी तालुकाभरातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा, यासाठी सर्वच पातळीवर पाठपुरावा चालू केला आहे.
चौकट...
गावोगावी जाऊन जनजागरण करणार : प्रवीण जाधव
अतिवृष्टीमुळे माझ्या शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले. पिके संरक्षित राहावीत, यासाठी शेतकरी विमा काढतो. यंदा विमा कंपन्यानी अटी दाखवून विमा नाकारला. याबाबत आम्ही थेट मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून विमा मिळवून द्यायची विनंती केली, पण तो मिळाला नाही. आता ग्राहक न्यायालयात धाव घेतली आहे. गावोगावी जाऊन विमा भरलेल्या पावत्या गोळा करणार आहोत. त्या सर्व शेतकऱ्यांना विमा द्यावाच लागेल, तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे.