कोरोनाच्या भितीने शेतकर्याचा गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:33 IST2021-04-07T04:33:40+5:302021-04-07T04:33:40+5:30
बोरी येथील एक ४८ वर्षीय शेतकरी सर्दी, खोकल्याचा त्रास होत असल्याने ३ एप्रिल रोजी उमरग्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी ...

कोरोनाच्या भितीने शेतकर्याचा गळफास
बोरी येथील एक ४८ वर्षीय शेतकरी सर्दी, खोकल्याचा त्रास होत असल्याने ३ एप्रिल रोजी उमरग्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेला होता. लक्षणे पाहून डॉक्टरनी त्यास कोरोना चाचणी करण्याची सूचना केली. रॅपिड टेस्टमध्ये अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, त्याने होम आयसोलेशनची मागणी केल्याने प्रशासनाच्या चौकशीनंतर त्या व्यक्तीला सोमवारी रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. त्याने २५ किमीचे अंतर पायी चालत जाऊन स्वत:चे शेत गाठले. शेतातील स्वतंत्र शेडमध्ये गेला. तेथे आपल्या कुटुंबातील सर्वाना बोलावून याची माहिती दिली. सायंकाळी साडेदहा वाजेपर्यंत त्यांच्या कुटुंबियांनी ३० ते ४० फुट अंतरावरुन संवाद साधला. जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्या शेतकऱ्याने मी पॉझिटिव्ह असल्याने तुम्ही येथे थांबू नका, मी आराम करतो, असे सांगून नातेवाईकांना घराकडे पाठविले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास शेडच्या बाजुला असलेल्या झाडाच्या खाली स्टुल ठेवून दोरीने फांदीस गळफास घेतला. मंगळवारी सकाळी हा प्रकार नातेवाईकांना दिसून आला. याची माहिती तातडीने पोलिस पाटील बालक मदने यांनी प्रशासनास दिली. यानंतर नाईचाकूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सुप्रिया टिके यांच्यासह कर्मचारी, पोलिस कर्मचारी व मोजक्याच लोकांनी सर्व खबरदारी घेत पंचनामा करुन शेतातच अंत्यसंस्कार केले.